रविवार ठरला भारनियमनाविना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सोलापूर - राज्यात मागील काही दिवसांपासून भारनियमन केले जात आहे. विजेची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत झाल्याने महावितरणला हा निर्णय घ्यावा लागला होता. आज मात्र मागणी व पुरवठा सारखाच झाल्याने राज्यात कोठेही भारनियमन करावे लागले नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. 

सोलापूर - राज्यात मागील काही दिवसांपासून भारनियमन केले जात आहे. विजेची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत झाल्याने महावितरणला हा निर्णय घ्यावा लागला होता. आज मात्र मागणी व पुरवठा सारखाच झाल्याने राज्यात कोठेही भारनियमन करावे लागले नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. 

राज्यभरात आज विजेची मागणी सुमारे 15 हजार 400 मेगावॉट इतकी होती. त्याचबरोबर विजेची उपलब्धताही सुमारे 15 हजार 400 मेगावॉट इतकी आहे. महावितरणने अल्पकालीन कराराद्वारे एक हजार 200 मेगावॉट विजेची खरेदी केल्याने राज्याच्या कोणत्याही भागात आज भारनियमन करावे लागले नाही. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केलेल्या निवेदनामध्ये दिवाळीत कोणत्याही प्रकारचे भारनियमन केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज रविवारी भारनियमन बंद करण्यात महावितरणला यश आले आहे. आपत्कालीन कराराद्वारे विजेची खरेदी केल्यामुळे भारनियमन बंद करण्यात महावितरणला यश आले. भारनियमन बंदची ही मोहीम किती दिवस चालू ठेवण्यात महावितरणला यश येते हे पाहावे लागणार आहे. 

महावितरणला आज महानिर्मिती कंपनीकडून सुमारे चार हजार 500 मेगावॉट, अदानीकडून एक हजार 800 ते दोन हजार मेगावॉट, रतन इंडियाकडून 500 मेगावॉट, केंद्रीय प्रकल्पातून तीन हजार 800 मेगावॉट, जेएसडब्ल्यूतून 300 मेगावॉट, सीजीपीएलमधून 560 मेगावॉट, एम्कोमधून 75मेगावॉट, पवन ऊर्जेतून 100 ते 200 मेगावॉट, उरण गॅस प्रकल्पातून 270 मेगावॉट, तर कोयनेसह जलविद्युत प्रकल्पातून सुमारे 100 ते 200 मेगावॉट वीज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रविवारी महावितरणला भारनियमन करावे लागले नाही. पुढील काही दिवसांत स्थिती पूर्ववत आणण्यात महावितरणला यश येते का याकडे राज्याचे लक्ष आहे. 

Web Title: solapur news Without loadshedding