प्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात मात्र सरकारच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीच्या वेगात कोसो मैलाचे अंतर पडल्याचे प्रकर्षाने दिसून येते. 

नाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान झाली आहेत. याचा वेग वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांपर्यंत सौर कृषी वाहिनी पोचविण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्‍चित केले. प्रत्यक्षात मात्र सरकारच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीच्या वेगात कोसो मैलाचे अंतर पडल्याचे प्रकर्षाने दिसून येते. 

मोहदी (जि. यवतमाळ), बुटीबोरी, खापा (जि. नागपूर), राळेगणसिद्धी (जि. नगर) असे चार पथदर्शी प्रकल्प सुरू होत आहेत. ‘रूफ टॉप सोलर’च्या माध्यमातून सरकारी कार्यालये, शाळा, पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वीज सौर ऊर्जेच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दुर्गम आदिवासी पाड्यांवर मजुरांना शेती करणे शक्‍य होणार आहे. याशिवाय सौर पथदिव्यांसारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर झाले आहेत. पण एकदा सौर पथदिवे लावून त्याच्या उद्‌घाटनाचा गाजावाजा झाली की, वर्षानुवर्षे दुरुस्तीचे नाव घेतले जात नाही. ही परिस्थिती सुधारण्याची गरज आहे.

खानदेशात चार प्रकल्प
जळगाव - केंद्र सरकारने एक लाख ७५ हजार मेगावॉट इतकी वीज अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करण्याचा पुढाकार घेतला. सौरऊर्जेची मागणी वाढत असून खानदेशात चार सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी झाली आहे. चाळीसगाव तालुक्‍यातही दीडशे मेगावॉटचे दोन प्रकल्प सुरू झालेत. मोर धरणाजवळ ६० मेगावॉटच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून त्याचे कामही लवकरच सुरू होईल. साक्री (धुळे) येथे दीडशे मेगावॉट आणि दोंडाईचा येथे महाजेनकोच्या ५०० मेगावॉटच्या प्रकल्पाची उभारणी होत आहे.

पाणी तापविण्यासाठी वापर 
कोल्हापूर - वीज निर्मितीसाठीच्या कोळशाचे भाव वाढत असल्याने वीजनिर्मितीचा खर्च वाढता आहे. यावर उपाय म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्याचे प्रयत्न झाले. पण प्रत्यक्ष वापर प्रभावीपणे होत नाही. महाऊर्जातर्फे (मेडा) सौर ऊर्जा उपकरणांसाठी विशेष अनुदान योजना राबविली. यातून गृहप्रकल्पांपासून शेती व गावठाणला उपयोगी पडतील, अशी सौर ऊर्जा यंत्रणा खरेदीसाठी २५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येत होते. त्याचा लाभ काही शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण भागात घेतला गेला. मात्र सौर ऊर्जेचे मोठे प्रकल्प उभे करून त्यातून निर्माण होणारी वीज घर, कार्यालयात वापरणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यात कमी आहे. मध्यंतरी सरकारी कार्यालयांवर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याचा आदेश निघाला; मात्र त्याची अंमलबजावणी २० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाली नाही. अशात मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना शेतकऱ्यांना लाभ देणार होती. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ११ प्रस्ताव आहेत. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात पाणी गरम करण्यासाठी सौर ऊर्जा वापरण्याचे प्रमाण वाढले. २५ पासून पाच हजार लिटरपर्यंतचे पाणी गरम करणारी यंत्रणा पुरविणाऱ्या २५ खासगी कंपन्या आहेत.

दुर्गम भागाला वरदान
पोहाळी (ता. सुरगाणा) येथील आदिवासी गावात सौर कृषिपंपांमुळे रब्बीचे पीक घेणे शक्‍य झाले असून मजुरीसाठी स्थलांतर थांबले. येथील भास्कर गावित यांच्या दीड एकरात भात पीक होत असे. पण तेवढ्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्‍य नसल्याने खरिपानंतर त्यांना रब्बी हंगामात मजुरीसाठी स्थलांतर करावे लागायचे. शेतात विंधन विहीर असूनही एक किलोमीटर अंतरावर ११ किलोवॉट उच्च विद्युत दाब वाहिनीला कमी दाबाच्या वाहिनीत बदलण्यासाठी रोहित्र लागते. मात्र फक्त एका वीजजोडासाठी रोहित्रासह नवी वाहिनी टाकणे शक्‍य नव्हते. सौर ऊर्जेच्या तीन अश्‍वशक्तीच्या पंपासाठी त्यांना अनुदान मिळाले. प्रस्तावाच्या १६ हजार २०० रुपये खर्चातून सौरपंप मंजूर झाल्याने विंधन विहिरीवरून शेतात सिंचन सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे खरिपानंतरही दुसरे पीक घेणे त्यांना शक्‍य झाले. टोमॅटो, गहू, हरभरा ही पिके ते घेऊ लागले आहेत.

सौरपंपांची प्रतीक्षा
विजेचा तुटवडा आणि दुर्गम भागात वीज पोचविण्यास अडथळे असल्याने ‘महावितरण’ने सौर कृषिपंपांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील १९२ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याचे काम ‘महावितरण’कडून करण्यात येणार आहे. मात्र सौरपंप वितरणाची अद्याप प्रतीक्षा आहे.

‘नेट मीटरिंग सिस्टीम’
ग्रामीण भागाला उपयुक्त असलेले ग्राम सौरदीप उपलब्ध आहेत. यात एक व दोन वॉटचे प्रत्येकी एक एल.ई.डी. बल्ब असतात. त्याला एक सोलर पॅनल व चार्जर बसविण्यात आला आहे. मात्र आता बॅटरीमध्ये वीज साठवून ठेवण्याऐवजी ‘नेट मीटरिंग सिस्टिम’ घराला लावल्यास ‘रूफ ऑफ सोलर’द्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर दिवसा करणे व उरलेली वीज महावितरणला देता येणे शक्‍य आहे. ही यंत्रणा बसविण्यास जळगाव जिल्ह्यात सुरवात झाली. याशिवाय समृद्ध ग्राम योजनेंतर्गत दीडशे ग्रामपंचायतींना सौरदिवे लावले आहेत.

Web Title: Solar Power Project Electricity Street Light