मुंडण करून सोनूने दिले उत्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुस्लिम मित्राकडून कापून घेतले केस

मुस्लिम मित्राकडून कापून घेतले केस
मुंबई - गायक सोनू निगम याने आपल्याविरोधात काढण्यात आलेल्या फतव्याला चोख उत्तर देत मुंडण करून घेतले आहे. मुस्लिम नेते आणि पश्‍चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेड कौन्सिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनूविरोधात फतवा काढला होता. सोनूचे मुंडण करून त्याला जुन्या चपलांचा हार घालणाऱ्या व्यक्तीला 10 लाखांचे बक्षीस देणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे सोनूने मुस्लिम मित्र हकीम आलीम याच्याकडूनच केस कापून घेतले आणि कादरी यांना प्रत्युत्तर दिले.

सोनूने आपली भूमिका मांडण्यासाठी अंधेरी येथील त्याच्या घरी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. तो म्हणाला, की ज्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण आयुष्यात मोहंमद रफी यांना आपले वडील मानले, ज्याच्या गुरूचे नाव उस्ताद गुलाम मुस्तफा खान आहे, तो व्यक्ती मुस्लिमविरोधी आहे, असे कुणी कसे काय म्हणू शकता? असे असेल तर ही तुमची समस्या आहे, माझी नाही.

मी फक्त अजानबाबत बोललो नव्हतो, मंदिरे व गुरुद्वारांच्या ध्वनिवर्धकांबद्दलही बोललो. माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर माफ करा, असे म्हणत सोनूने दिलगिरी व्यक्त केली.

सोनूने सोमवारी ट्विटरवरून "मी मुस्लिम नसूनही मला रोज पहाटे अजानच्या ध्वनिवर्धकावरून येत असलेल्या आवाजामुळे उठावे लागते. भारतात धर्म लादणे कधी थांबणार आहे?' असे म्हटले होते. त्याने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले होते, की मोहंमदांनी इस्लाम धर्म स्थापन केला, तेव्हा वीज नव्हती. मग एडिसनच्या या शोधानंतर हा त्रास का? मला नाही वाटत की कोणतेही मंदिर किंवा गुरुद्वारा सकाळी धर्मपालन करा सांगण्यासाठी ध्वनिवर्धकाचा वापर करून सगळ्यांना उठवतात, ही फक्त गुंडगिरी आहे.

Web Title: sonu nigam answer after mundan