'अजान'मुळे जाग आल्याने गायक सोनू निगम संतप्त

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई - ध्वनिवर्धकावरून पहाटे दिल्या जाणाऱ्या "अजान'मुळे झोपेतून जाग्या झालेल्या गायक सोनू निगम याने ट्‌विटरवर याविषयीचा उद्‌वेग व्यक्त केला. "देव सगळ्यांना सुखी ठेवो. मी मुस्लिम नसूनही मला रोज पहाटे अजानच्या आवाजामुळे उठावे लागते. भारतात धर्म लादणे कधी थांबणार आहे?' असा सवाल त्याने केला. त्याच्या या भाष्याला काही जणांनी पाठिंबा दिला आणि काही जणांनी खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

"महमदांनी इस्लाम धर्म निर्माण केला तेव्हा वीज नव्हती, मग एडिसनच्या या शोधानंतर हा त्रास का?' असा सवाल करत त्याने "मला नाही वाटत की कोणतेही मंदिर किंवा गुरुद्वारात सकाळी धर्मपालन करा, हे सांगण्यासाठी ध्वनिवर्धकाचा वापर करून सगळ्यांना उठवत असेल. ही गुंडगिरीच आहे,' असा संताप व्यक्त केला आहे.

या त्याच्या वक्तव्यावर हिंदी चित्रपटसृष्टीत प्रतिक्रिया उमटत आहेत. अनुपम खेर यांनी सोनूच्या ट्विटर अकाउंटवरून असे ट्विट्‌स आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले आहे. महेश भट्ट यांनी याविषयी काहीही बोलणे निरर्थक असल्याचे म्हटले आहे. संगीत क्षेत्रातील शान, कैलाश खेर यांनी मात्र सोनूला पाठिंबा दिला आहे. सोना मोहापात्रा, बाबा सेहगल यांनी ट्विटरवर असे विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा होता, असा टोला लगावला आहे.

Web Title: sonu nigam distressed