मॉन्सून महाराष्ट्राच्या वेशीवर; गोव्यात दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे : आज (ता.7) मृग नक्षत्राच्या प्रारंभीच मृगाच्या पहिल्याच पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागील अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले ओढे, नाले पहिल्याच पावासाने खळखळून वाहू लागले आहेत. नैऋत्य मॉन्सून वारे महाराष्ट्रात उद्या दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : आज (ता.7) मृग नक्षत्राच्या प्रारंभीच मृगाच्या पहिल्याच पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागील अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले ओढे, नाले पहिल्याच पावासाने खळखळून वाहू लागले आहेत. नैऋत्य मॉन्सून वारे महाराष्ट्रात उद्या दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

आज पहाटेच मुबईंत जोरदार पाऊस सुरु झाला असुन येत्या 8, 9 आणि 10 जूनला मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस पडत आहे. लालबाग, परळ, दादर, माहिम, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदवली, विक्रोळी, घाटकोपर, माटुंगा, उल्हासनगर ठाणे या परिसरात कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून सर्व अधिकाऱ्यांची शनिवार आणि रविवारची (8 आणि 9 जून) सुट्टी रद्द केली आहे. पावसामुळे अजून तरी शहरातील सकल भागात पाणी साचलेलं नाही तसेच, रेल्वेवसेवेवर परिणाम झालेला नाही.

पुण्यात काल काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला. मुठा नदीची पातळी काही प्रमाणात वाढली आहे. 

आज पहाटेपासून पंढरपूर व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असुन सरासरी 40 मिलीमीटर इतका पाऊस झाला. जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेले बंधारा देखील भरले आहेत. दुष्काळी भागात पावसाळ्याची चांगली सुरवात झाल्याने खरीप हंगामाच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

नांदेड शहर, परिसरात  शहर व परिसरात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी २९ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे  पैनगंगा  नदीला  मोठा  पुर  आला  असुन नदीची पाणीपातळी वाढली आहे. नांदेड शहर, ग्रामीण, विष्णुपुरी, लिंबगाव, तुप्पा,तरोडा, वसरणी परिसरात हा पाऊस चांगला झाला.

परभणीसह जिल्हयात सरसरी 5. 83 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस पूर्णा तालुक्यात 12.6 मिलीमिटर झाला. गंगाखेड, पालम, पूर्णा, सोनपेठ, पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू समाधानकारक पाऊस झाला असुन पेरणीची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये 30 पैकी 19 मंडळात दमदार पाऊस झाला असून त्यात माळहिवरा महसूल मंडळात 30, बासंबा 18, कळमनुरी 15, नांदापूर 25, आखाडा बाळापुर 18, डोंगरकडा 14, वारंगा 12, गोरेगाव 13, आजेगाव 12, वसमत 12, हट्टा 16, गिरगाव 19, कुरुंदा  14, टेंभुर्णी 11, आंबा 15, हयातनगर 23, जवळा बाजार 12, येहेळगांव सोळंके १३, साळणा मंडळात दहा मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.

लातूर  जिल्ह्य़ात सरासरी 28.43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात गुरुवार पहाटे दहाही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  लातूर 11.63, ओसा 30.29, रेणापूर 13.25, उदगीर 22.71, अहमदपूर 24, चाकूर 44.40, जळकोट 23, निलंगा 44, देवणी 19.67,शिरूर अनंतपाळ 51.33. मिलीमीटर पाऊस पावसाची नोंद झाली.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागांत मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी हलकाशा पाऊस झाला. जेवळी (ता. लोहारा), कडदोरा (ता. उमरगा ) दमदार तर,  तेर (ता. उस्मानाबाद), अनाळा (ता. परंडा) येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. बलसूरसह परिसरातील  कडदोरा, निंबाळा, एकुरगा, व्हंताळ, जकेकुर, रामपूर, येळी,वाडी आदी भागांत  कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरील लावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: south-west monsoon will hit tomorrow in Maharashtra