
‘नेमकं पावसापूर्वीच सोयाबीन सोंगून टाकलं, मशीनमध्ये टाकून मोंढ्यावर न्यायचं व्हतं. पण त्याआधीच वैऱ्यासारखं पावसानं गाठलं. अन् सगळा सत्यानास झाला. सोंगलेल्या सोयाबीनचं दाणं काळं पडलं, कोम उगवून आलं. काय सांगावं, कशाचं पैसं करावं अन् कुठून पैसं आणावं. आपल्याजवळ नाहीच काही, तं कोण ओळखणार आपल्याला?'
घारेगाव (जि. औरंगाबाद) - ‘नेमकं पावसापूर्वीच सोयाबीन सोंगून टाकलं, मशीनमध्ये टाकून मोंढ्यावर न्यायचं व्हतं. पण त्याआधीच वैऱ्यासारखं पावसानं गाठलं. अन् सगळा सत्यानास झाला. सोंगलेल्या सोयाबीनचं दाणं काळं पडलं, कोम उगवून आलं. काय सांगावं, कशाचं पैसं करावं अन् कुठून पैसं आणावं. आपल्याजवळ नाहीच काही, तं कोण ओळखणार आपल्याला?'
पैठण तालुक्यातील घारेगावचे शेतकरी काकासाहेब शेषराव थोरे व्यथा मांडत होते. दिवाळी उलटली, पण घरात अजून कोणताच माल आला नाही. दुष्काळ असूनही मागचं साल बरं होतं, म्हणायची येळ आली. तेव्हा सहा क्विंटल कापूस पिकला होता, अशी कैफियत याच गावातील शेतकरी शिवाजी थोरे यांनी मांडली.
काकासाहेब म्हणाले, ‘‘कुटुंबाकडं साडेबारा एकर शेती. चार एकर सोयाबीन, दोन एकर मका, एक एकर बाजरी, तीन एकर कपाशी अशी पिकं. पण यंदा काढणी, वेचणीच्या हंगामात लागून बसलेल्या पावसानं घात केला. निसर्गानं केलेली इतकी बेकार परिस्थिती मी आजवर पाहिली नाही.
पंचनाम्यासाठी अजून कुणी फिरकलं नाही शेतात. आता जनावराच्या चाऱ्याची सोय कशी लावावी हा प्रश्न आहे. वाट बघायची सरकारनं काही केलंत हाये, आपणं काय करू शकतो. उचलले कर्ज जास्त अन माफी दीड लाखाची, उर्वरीत भरण्याची ताकद नसल्यानं त्यात अजून बसलो नाही. २०१२ पासून सारखं शेतीवर आघात सुरू आहेत. या सात वर्षांत मोसंबी बाग गेली, आंबा बाग गेली. जगणंच अवघडं होऊन बसलं.’’
शिवाजी विनायक थोरे म्हणाले, की माझं साडेतीन एकर सोयाबीन होतं. सारं पावसानं भिजलं. त्यातून आता काहीच हाती लागणार नाही. सुरुवातीला पाऊस चांगला होता. मध्यात थांबल्यानं पिकं अडचणीत आली होती. पुन्हा थोडा झाल्यानं थोडा खेळ जमल्यासारखं वाटलं. पण काढणीच्या येळंला लागून बसल्यानं सोयाबीनचं आलेलं पीक डोळ्यादेखत नाहीसं झालं. तीस-चाळीस हजार खर्च झाले. तीन साडेतीन एकरांतच सरकी. तिचीही अवस्था बिकट. फुटलेला कापूस भिजला. खाली पडला. आता वेचायला जड चाललंय. सरकीला कोंब फुटले. ५० हजार सरकीवर खर्च झाले. दिवाळी उलटली पण घरात अजून कोणताच माल आला नाही. मागच्या वर्षी बरं होतं, म्हणायची येळ आली. पंचनामे झाला, त्यांनी क्षेत्र लिहून घेतलं.’