SP सातपुते म्हणतात, मुले पळविणाऱ्या टोळीची अफवाच! पण, शाळा, पालकांनी सतर्क राहावे

मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत आहे, अशी अफवा सोशल मीडियातून दूरवर पसरली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तशी कोणतीही नोंद नाही. तरीपण, शाळा आणि पालकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
SP TEJASWI SATPUTE
SP TEJASWI SATPUTEsakal

सोलापूर : मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत आहे, अशी अफवा सोशल मीडियातून दूरवर पसरली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तशी कोणतीही नोंद नाही. तरीपण, शाळा आणि पालकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळा आहेत. बहुतेक शाळांमध्ये मुले स्वत:हूनच शाळेला जातात. पण, मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या अफवेनंतर काही पालकांनी मुलांना घरीच ठेवणे पसंत केले आहे. पण, अफवा असली तरीदेखील पोलिसांनी शाळांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. शाळेत आलेल्या मुलाला न्यायला कोणी अनोळखी व्यक्ती किंवा महिला आल्यास, संबंधित शाळांनी संबंधित पालकाला कॉल करून त्या व्यक्तीची खात्री करावी आणि मगच मुलाला त्याच्याकडे सोपवावे. शाळा परिसरात संशयास्पद व्यक्ती फिरत असल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

मुलांना समजावून सांगा ‘या’ गोष्टी

  • मुलांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्याशी योग्य संवाद साधा

  • मुलांना परिस्थिती समजावून सांगा की, अनोळखी व्यक्तीशी बोलू नको

  • अनोळखी व्यक्तीने चॉकलेट, खाऊ, मोबाईल किंवा व्हिडिओ गेम दिला तरी घेऊ नका

  • जर कोणी तुम्हाला हात लावला किंवा धरले तर आरडा-ओरडा करा, आजूबाजूच्या लोकांकडून मदत मागा

  • रस्त्याने चालताना पालकांचा हात सोडू नका, पुढे-मागे पळू नका

पालकांनी अशी घ्यावी काळजी

  • मुलांना परिस्थिती समजावताना त्यांच्या मनात भीती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या

  • गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेऊ नका; सतत सतर्क राहा

  • मुलांना गर्दीत नेले तर त्यांचा हात सोडू नका. त्यांचा स्पर्श होत राहील याची काळजी घ्यावी. पदर, शर्ट हातात द्या

  • काही आक्षेपार्ह हालचाल आढळल्यास ११२ या टोल फ्री नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवा

पोलिसांचे आवाहन

  • पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती तुम्ही पुढे फॉरवर्ड करू नका; व्हिडिओ, ऑडिओवर विश्वास ठेवू नका

  • पोलिसांनी सांगितल्याशिवाय नागरिकांनी कोणताही मेसेज किंवा व्हिडिओ व्हायरल करू नये

  • तुमच्या मोबाईलवर मुलांच्या अपहरणासंदर्भात काहीही आलं, संशयास्पद वाटलं तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधा

  • पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास ११२ वर संपर्क करावा

शाळा, पालकांनी घ्यावी खबरदारी

जिल्ह्यात मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याचे कोणतेही रेकॉर्ड पोलिसांत नाही. सोशल मीडियातून अफवा पसरविण्यात आली आहे. तरीपण, पालकांनी व शाळांनी सतर्कता बाळगावी. पालकांनीच मुलांना आणायला शाळेत जावे. शाळांनीही पालकांऐवजी कोणी दुसरा अनोळखी मुलाला न्यायला आला, तर संबंधित मुलाच्या पालकांकडे खात्री करावी.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com