ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण;  ट्विट करून दिली माहिती  

अथर्व महांकाळ  
Friday, 4 September 2020

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांना कामानिमित्त आपल्या मतदारसंघाचा दौरा करावा लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांशी त्यांचा संबंध येत आहे. यातच त्यांना कोरोनाची लागण होत आहे.

नागपूर: राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबण्याचे नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस कोरोनाबंधितांचा आकडा वाढतच चालला आहे. मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात सध्या पुराचे संकटही आले आहे. विदर्भातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्वतःच्या मतदारसंघात असताना महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. नाना पटोले यांनीं स्वतः ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांना कामानिमित्त आपल्या मतदारसंघाचा दौरा करावा लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांशी त्यांचा संबंध येत आहे. यातच त्यांना कोरोनाची लागण होत आहे. मागील काही महिन्यात काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण, मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच खासदार नवनीत राणा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

 

 

 

काय म्हणाले नाना पटोले 

"गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये" असे नाना पटोले यांनी ट्विट करून म्हंटले आहे. 

तसेच "गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन." असे आवाहनही त्यांनी केले आहे. 
    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Speaker of Maharashtra Legislative assembly Nana paole tested corona positive