International Tiger Day : पुन्हा डरकाळी ऐकायची असेल तर...!

अनुज सुरेश खरे 
सोमवार, 29 जुलै 2019

शक्तिशाली आणि तितकाच रुबाबदार प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा सध्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. वाघ जगवणे, ही फक्त सरकारची नाही; तर आपलीही जबाबदारी आहे.

जगभर 29 जुलै हा दिवस "व्याघ्र दिन' म्हणून साजरा केला जातो. जंगलातील शक्तिशाली आणि तितकाच रुबाबदार प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा सध्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. वाघ जगवणे, ही फक्त सरकारची नाही; तर आपलीही जबाबदारी आहे. व्याघ्र संवर्धनासाठी आधी आपण निसर्ग समजून घ्यायला हवा; मगच वाघही आपसूकच समजेल. 

international tiger day

वाघ हा मुळात थंड प्रदेशातला प्राणी. हजारो वर्षांपूर्वी तो भारतात आला, असे शास्त्रज्ञ सांगतात. विसाव्या शतकाच्या सुरवातीला भारतात सुमारे एक लाख वाघ होते. स्वातंत्र्यपूर्व काळात वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. स्वातंत्र्योत्तर काळातही या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. 1970 सालच्या सुरवातीला भारतात अवघे अठराशे वाघ शिल्लक राहिले होते. अशातच वाघांच्या या घटलेल्या संख्येची दखल भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांनी घेतली. विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्राण्याला वाचविण्यासाठी 1973 साली "प्रोजेक्‍ट टायगर' हा प्रकल्प सुरू केला. पहिल्या टप्प्यात भारतातील नऊ जंगलांना व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. आपल्या महाराष्ट्रातील मेळघाट हा त्या वेळी घोषित केलेला व्याघ्र प्रकल्प. पाठोपाठ वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात आला आणि वाघांच्या शिकारीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली. 

इंदिराजींनी राबविलेल्या या कडक धोरणांमुळे वाघांची संख्या वाढायला लागली. 2002 सालच्या गणनेनुसार ती 3,642 पर्यंत पोचली होती. पण, पुढे चोरट्या शिकारींमुळे आणि काही इतर कारणांमुळे 2006 साली ती 1,411 पर्यंत घटली. या घटत्या संख्येची दखल घेऊन भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि वाघांसंबंधीचे निर्णय घेण्यासाठी "नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन ऍथॉरिटी'ची स्थापना करण्यात आली. आज भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या 50 पर्यंत पोचली असून, 2015 च्या गणनेनुसार 2,226 वाघ भारतातील विविध व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांत आहेत. 

international tiger day

विकास प्रकल्पांचे नियोजन हवे 
वाघांना सर्वांत मोठा धोका म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याचा. मुळात वाघ हा स्वतःची हद्द बनवून एकट्याने राहणारा प्राणी आहे. सिंहासारखे तो कळपाने राहत नाही. सुमारे दोन ते अडीच वर्षे पिले आईबरोबर असतात. हा कालावधी त्यांचा वाघ बनण्याचा असतो. आईपासून अनेक गोष्टी शिकून पिले बाजूला होतात अथवा आई त्यांना बाजूला करते. असे युवा वाघ पांगले, की अर्थातच त्यांना स्वतःची हद्द निर्माण करण्याची गरज आणि जिद्द असते. हे युवा वाघ अनुरूप जंगलाच्या शोधार्थ काहीशा किलोमीटरचा प्रवासही करतात. आता वाढत्या महामार्गांमुळेही वनक्षेत्रे कमी होत चालली आहेत. तसेच, या मार्गांवर वाहनांच्या वाढत्या वेगामुळे वन्यप्राण्यांना धोकाही निर्माण झाला आहे. पायाभूत विकास प्रकल्प राबविणाऱ्या प्रत्येक राज्याच्या प्राधिकरणाने विकास प्रकल्पांचे प्राथमिक पातळीवर नियोजन करतानाच अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमधून महामार्ग अथवा रस्ते जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. 

..तरच संघर्ष रोखता येईल 
महाराष्ट्रातील टिपेश्वर, पांढरकवडा, ताडोबा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, पेंच या भागांत वाघांची संख्या चांगली आहे. या भागांच्या संक्षणासाठी आणि या भागांच्या अधिक विकासासाठी दीर्घकालीन योजना राबविण्याची गरज आहे. तसेच मेळघाट, नागझिरा यासारख्या जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र सरकार "महाराष्ट्र वन्यजीव निधी' या नावाने एक निधी अस्तित्वात आणण्याच्या विचाराधीन आहे. याचा वाघांसाठी उपयोग होऊ शकतो. पोषक परिस्थिती असल्यामुळे योजना नीट राबविल्या, तर येथील वाघांची संख्याही वाढू शकेल आणि उपरोक्त जंगलांवर संख्येच्या दृष्टीने असणारा ताणही कमी होईल. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर वाघांची संख्या वाढत आहे. पण, आवश्‍यक भूप्रदेशाची व्याप्ती मात्र तितकीच आहे. त्यामुळे मेळघाट, नागझिरासारख्या जंगलांत वाघांच्या स्थलांतराचा प्रयत्न करता येऊ शकेल, यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करता येईल. 

international tiger day

कॉरिडॉर्सचे महत्त्व लक्षात घ्यावे 
महाराष्ट्र वन विभागाने "वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'सोबत करार केला आहे; ज्यात वाघांच्या दहा वर्षांच्या विकीरणाचा अभ्यास या संस्थेने करायचा आहे. यात प्रामुख्याने वाघिणींच्या विकीरणाचा अभ्यास असेल; जेणेकरून त्यातून वाघांच्या पुढील तीन पिढ्यांचा अभ्यास या संस्थेला करता येऊ शकेल. या विकीरणाच्या अभ्यासातून कॉरिडॉर्सचे संरक्षण आणि संवर्धन करता येईल, हा हेतू वन विभागाने समोर ठेवला आहे. युवा वाघ आपली स्वतःची हद्द स्थापित करण्यासाठी आपल्या जन्मस्थानापासून विखुरतात त्याला विकीरण म्हणतात. 

वन विभागाच्या आकडेवारीनुसार, 2006 साली महाराष्ट्रात वाघांची संख्या सुमारे 103 होती. 2010 साली ही संख्या वाढून ती सुमारे 169 वर पोचली. 2014 च्या गणनेनुसार सुमारे 190 वाघ महाराष्ट्रात होते. तर, आज हीच संख्या सुमारे 225 वर पोचली असावी, असा वन विभागाचा अंदाज आहे. तर, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी पाहिल्यास 2013 ते 2018 या काळात महाराष्ट्रात 89 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 56 वाघ नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडले आहेत. यात प्रामुख्याने वय, हद्दीसाठी झालेले अंतर्गत संघर्ष, आजार, दुखापत अशा कारणांचा समावेश आहे. तर, दहा वाघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. वीस वाघांची शिकार झाली आहे आणि 3 नरभक्षक वाघांना वन विभागाकडून ठार मारण्यात आले आहे. या 89 वाघांपैकी 35 वाघ हे संरक्षित अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प यात मृत्युमुखी पडले आहेत. तर 54 वाघ हे या संरक्षित भागांच्या बाहेर मरण पावले आहेत. या आकडेवारीवरून आपल्या सहज लक्षात येईल, की संरक्षित अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेरही वाघांची संख्या मोठी. उदाहरणार्थ ः ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बाजूच्या भागात, ब्रह्मपुरीसारख्या भागात वाघांची संख्या चांगली आहे. संरक्षित भागातून विकिरीत झालेले वाघ या अशा प्रदेशात स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कॉरिडॉर्सचे महत्त्व अधोरेखित होते. 

international tiger day

निसर्ग समजायला हवा 
वाघ वाचविण्याच्या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचं पहिलं पाऊल म्हणजे चोरट्या शिकारीला आळा घालणे. बहुतांश व्याघ्र प्रकल्पांनी यासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्सची स्थापना केली आहे. आपण याबाबतीत वन विभागाच्या पाठीशी खंबीरपणे राहायला हवे. रानडुक्कर, नीलगाय, सांबर, चितळ अशा प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतीला विद्युत कुंपण सर्रास लावले जाते. 2013 ते 2018 या काळात शिकार झालेल्या 20 वाघांपैकी 9 वाघ हे शेतांना लावलेल्या विजेच्या कुंपणातील विजेच्या धक्‍क्‍याने मरण पावले आहेत. अशा कुंपणावर शासनाने बंदी आणली आहे. सौर कुंपणाला मात्र परवानगी आहे. अशा प्रकारच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोचवणे आणि त्याची नीट माहिती करून देणे, हेही आपण करू शकतो. वाघ वाचविण्यासाठी निसर्ग वाचविणे अत्यंत आवश्‍यक आहे. आणि निसर्ग वाचवायचा असेल, तर निसर्गाविषयी आपण साक्षर असणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत. आणि त्यामुळे साहजिकच आपण निसर्गापासून दूर चाललो आहोत. मोबाईल, इंटरनेटच्या युगात आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो, हेच आपल्या ध्यानात राहिलेले नाही. वाघ वाचविणे, हे काही एकट्या-दुकट्याचे अथवा फक्त सरकार-वन विभागाचे काम नाही. ते आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.  

(लेखक हे निसर्ग पर्यटन मंडळ, महाराष्ट्र राज्यचे सदस्य आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special article on international tiger day by Anuj Khare