Loksabha 2019 : विकासाची व्याख्या 

दीपा कदम 
बुधवार, 3 एप्रिल 2019

निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. नेते, सभा, हेलिकॉप्टरची घरघर, रोड शो अन्‌ आरोप प्रत्यारोपांनी माध्यमविश्‍व व्यापले आहे. या सगळ्या गोंधळात दुर्लक्षित राहिलेल्या घटकांवर प्रकाशझोत टाकणारी आमच्या राज्यभरातील बातमीदारांनी लिहिलेली ही विशेष मालिका आजपासून!

नागपूर शहरापासून अवघ्या किलोमीटरवरचं शिवणगाव. गावाच्या तोंडावरूनच मेट्रोचा मार्ग. आजूबाजूला विस्तीर्ण रखरखीत पठार. वरून आग ओतणारा सूर्य. अशा त्या वातावरणात कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही; पण दिसतात ती रवंथ करीत बसलेली दुभती जनावरं. 

शिवणगावच्या टोकाला जिथं मिहान प्रकल्पाची सीमा संपते; त्याच्या शेवटाला अडीचशे गाई-म्हशींचं अक्षरश: गोकूळ नांदतंय. पाण्याचं दुर्भिक्ष, हिरव्या चाऱ्याचा अभाव अशा परिस्थितीतही ती जनावरं मात्र तरतरीत दिसतात. ही जनावरं अजय बोडे या शेतकरी-व्यावसायिकाच्या मालकीची. पाण्याअभावी शेतकरी दावणीची गुरं सोडून देऊ लागलेत. गायीगुरं पाळणं हा आता शौक गणला जाऊ लागला आहे. अशा परिस्थितीत अजय बोडे याला हे सारं परवडतं कसं? 

संध्याकाळच्या वेळी त्याला गाठलं. त्याचं गायी दोहण्याचं काम सुरू होतं. ते न थांबवताच तो सांगू लागला... वारसाहक्‍कानं आलेलं हे काम. ते कसं सोडणार? माझ्या कुटुंबाचा हा पारंपरिक धंदा आहे; दोनशे वर्षांपासूनचा. शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही दुधाचा रतीब टाकतो. गाई-वासरांचा सांभाळ करायचा, त्यांचीच सेवा करून पोट भरायचं हेच वाडवडिलांनी शिकवलं. आमच्याकडे जनावरांची 1911 ची पावतीपण आहे. 

नागपूरमध्ये 250 जनावरं असणारा आणि दिवसाला एक हजार लिटर दूध डेअरीला पुरवणारा अजय बोडे हा एकमेव. अजय आणि त्याचे तीन भाऊ आठ मजुरांसह सकाळी उठल्यापासून गायीगुरांच्या पाठीमागं असतात. पण, या पठारावर वसलेलं गोकूळ येत्या काही दिवसांतच उठण्याची शक्‍यता आहे. मिहान प्रकल्पात बोडे कुटुंबाच्या 44 एकर जमिनीचं अधिग्रहण झालंय. 

दोन हजार हेक्‍टरपेक्षा अधिक जागेवर मिहान प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पांतर्गत 65 कंपन्या येतील. त्यासाठी आजूबाजूच्या साताठ गावांतील जमिनींचं अधिग्रहण करण्यात आलंय. 

प्रकल्पग्रस्तांना घरासाठी जागा आणि जमिनीची रक्कम दिली जातेय. पण, अजयला त्याच्या डोक्‍यावरच्या छपराबरोबरच त्याच्या जनावरांच्या गोठ्याची चिंता आहे. अजयला 12/2 ची नोटीस नुकतीच आलीय. न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. कोर्टात काय निकाल लागेल... पैसे किती मिळतील.... वगैरे प्रश्‍न त्याच्यासाठी गौण आहेत. किती का पैसे मिळेनात; पण एवढी जनावरं कुठं घेऊन जाऊ? नागपूर शहराजवळ एवढी जनावरं घेऊन जाऊ शकेन अशी जागा त्यातून मला मिळेल का? माझ्यासाठी हे सोपं नाही? पण, याशिवाय दुसरं काही करण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही... डोळ्यांतलं पाणी लपवत त्यांनी गायीच्या पाठीवरून हात फिरवला. 

"अडीचशे जनावरं जगली तर माझं कुटुंब जगेल आणि माझा वडिलोपार्जित वारसा जगेल. मिहानमुळे किती तरी जणांना रोजगार मिळणार असतील, किती तरी कंपन्या उभ्या राहणार असतील; पण माझ्या फुललेल्या उद्योगाचं काय? एका बाजूला तुम्ही मेक इंडिया, मुद्रा योजना नवउद्योजकांसाठी आणता? गोसेवा करण्यासाठी अनुदान देता... मी तर हे सर्वच करतोय. मग माझा उद्योग नको का जगायला? माझ्या जनावरांच्या पायाखालची जमीन मिहान प्रकल्पाला जात असेल, तर त्यांना उभं राहण्यासाठी त्याच भागात जमीन नको मिळायला?' अजयचे हे प्रश्न विचारात पाडणारे होते. 

त्यांना म्हटलं, हा उद्योग सुटला, तर दुसरा करता येईल की? शिक्षण किती झालंय तुझं? त्यावर उत्तर आलं, "शाळेत कोण गेलंय? कळायला लागल्यापासून या जनावरांमध्येच वाढलो? त्यांनीच जगायला शिकवलं.' 

सरकारच्या जनावरांसाठी खूप योजना आहेत; त्याचा लाभ घेता का? त्यांना विचारलं. 
"अजिबात नाही. अनुदानावरचा उद्योग काही खरा नसतो. फक्त योग्य भाव काटछाट न करता मिळाला, तर शेतकरी जगतो. दुधाचं फॅट मोजणारी यंत्रं आहेत? पण, दोन कंपन्यांमध्ये एकाच दुधाचे वेगवेगळे फॅट्‌स येतात... याचा अर्थ कोणतरी फसवतंय. शेतकऱ्यांना फसवणारी ही साखळी आहे. तुम्हाला सांगतो, मोठ्या उद्योगांना आकाश मोकळं करून देता. ते खुशाल द्या. पण, छोट्या उद्योगांच्या पायाखालची जमीन हिरावून घेतली जाणार नाही, असा विकास करा...' 

शाळेच्या कुठल्याच इमारतीत न गेलेले अजय विकासाची व्याख्या सांगत होते. पण, त्यांची व्याख्या तशीही कोणाच्याही गावी नाही. निवडणूक प्रचारातून तर हा विकास गायबच झाला आहे. हिंदू-मुस्लिम-पाकिस्तान हे जणू रोजच्या जगण्याचे प्रश्न झाले आहेत... शिवणगावसारखी अनेक गावं, अजयसारखे अनेक शेतकरी-व्यावसायिक त्या प्रश्नांच्या ओझ्याखाली गाडले जात आहेत... 

Web Title: special series from the reporters on loksabha 2019

टॅग्स