Loksabha 2019 : प्रचाराबाहेरचं पाणी...

Loksabha 2019 : प्रचाराबाहेरचं पाणी...

अश्‍विनीच्या घरात पाण्याच्या दोन स्वतंत्र पाइपलाइन आहेत. एक ग्रामपंचायतीची, दुसरी खासगी. त्यात नव्याने आणखी एक पाइपलाइन येतेय. तीही खासगीच. साधारणतः पाण्याची पाइपलाइन एकच असते. ती स्थानिक महापालिका, ग्रामपंचायत वगैरेंकडून पुरवली जाते, हे आपले सामान्यज्ञान. त्याला हा फटका होता. येथे ग्रामपंचायतीला पाणीपट्‌टी तर भरली जातेच. शिवाय खासगी पाइपलाइनने पाणी देणाऱ्या गावच्या सरपंचाला दर महिना २०० रुपये दिले जातात आणि आता तिसऱ्या पाइपलाइनसाठीही २०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यात प्रत्येकासाठी डिपॉझिट दोन हजार रुपये, ते वेगळेच.

यवतमाळनजीक उमरपहाडीची ही कहाणी. अक्षरशः दगडी टेकाडावर वसलेलं हे गाव. या गावातल्या विहिरींच्या उजाड तळापर्यंत नजरही पोचत नव्हती. रखरखीत उन्हात कोरड्याठाक विहिरी विदर्भासाठी नवीन नाहीत. किंबहुना उन्हाळ्यात पाण्यासाठी उभा डाव मांडायचाच, अशी मनाची तयारी करूनच येथील ग्रामीण भाग दर वर्षी उन्हाळ्याला सामोरा जात असतो.

तेथे छायाचित्रे वगैरे काढणे सुरू असतानाच अश्‍विनी डोंगरे या चुणचुणीत तरुणीने अक्षरश: हात धरून तिच्या घरी नेलं. म्हणाली, ‘‘गावातली पाण्याची अवस्था काय, हे मी दाखवते तुम्हाला.’’ सिव्हिल इंजिनिअरिंग करून नागपूरला नोकरी करीत असलेली अश्‍विनी गावातल्या उकंडराव बाबा शेरे यांची नात. घराच्या कोपऱ्यात जमिनीच्या वर तोंड काढलेल्या दोन पाइपलाइन दाखवून ती उद्वेगाने म्हणाली, ‘‘या दोन्हींना पाणी येत नाही. आजोबांकडे आज अजून एक तिसरी पाइपलाइन घ्या सांगायला आला होता. घाणेरड्या, खारट पाण्याचापण बाजार मांडलाय.’’

गावातले कीर्तनकार काशिराम महाराज यांनी या परिस्थितीचा उलगडा केला. ‘गावात आतापर्यंत आलेल्या पाणीपुरवठा योजना यशस्वी झाल्या नाहीत. १५ लाखांच्या योजना कुठे गेल्या, हे फक्‍त सरपंचाला माहीत. गावातल्या सरपंचाच्या विहिरीचे दर वर्षी अधिग्रहण होतं. सरपंच अधिग्रहणाचे पैसे घेतो. त्या विहिरीत नाल्यातलं घाणेरडं पाणी आणून सोडतो. तेच पाणी त्याच्या खासगी पाइपलाइनने पाण्याची खासगी जोडणी घेणाऱ्यांना देतो. सरकारचे पैसे तर तो घेतोच, पण खासगी पाणीपुरवठा करण्यासाठी दर महिना घरटी २०० रुपये पण घेतो. एवढंच नाही, तर त्याच्या भावांनीसुद्धा आता खासगी पाणीपुरवठा सुरू केलाय. प्रत्येक घरात तीन ते चार खासगी नळ आणि त्याला पाणी नाही, अशी परिस्थिती.’’

बांधकाम सुरू असलेल्या एका मंदिराच्या आवारात गावातले लहानथोर मंडळी जमू लागली होती. शेरे सांगत होते, ‘‘क्षारयुक्‍त पाण्याने गावात सगळ्यांना मूत्रपिंडाचे आजार झालेत. गेल्याच महिन्यात त्यांची आई आणि त्या आधी त्यांचे वडील गेले. दोघेही गेले मूत्रपिंडाच्या आजारानेच. आज किमान दोनशेपेक्षा अधिक लोकांना मूतखड्याचा आजार आहे.’’

गावातल्या पाण्याची अवस्था पाहण्यासाठी पत्रकार आल्याची बातमी एव्हाना सरपंचाच्या घरापर्यंत पोचली होती. संगीता मिर्झापुरे या गावच्या सरपंचबाई. त्या आल्या नाहीत. पण, खासगी पाइपलाइनद्वारे पाण्याची विक्री करणारे त्यांचे यजमान अरविंद मिर्झापुरे मात्र त्यांची बाजू मांडायला आले. ‘‘सरकारच्या नळ पाणीयोजनेला पाणी नाही. माझ्या विहिरीत पाणी आहे. मी स्वत: पाइपलाइन टाकून विहिरीतून पाणी देतो. अधूनमधून दहा-पंधरा मिनिटांसाठी पाणी येतं. मी कोणाला जबरदस्ती करत नाही,’’ ते सांगत होते. त्यांच्या विहिरीचे अधिग्रहण केलेय का, यावर ते काहीच बोलायला तयार नव्हते. 

शुद्ध पेयजलाचा हक्‍क वगैरे गोष्टी बहुधा या उमरीपठारसारख्या गावांसाठी नाहीत. पाण्याची खासगी पाइपलाइन टाकून पाण्याचे वितरण करता येते का? सार्वजनिक पाण्याचे वितरण बंद का होते? पाण्याची विक्री करण्याचे त्याचे दर ठरवण्याचे अधिकार कोणी दिले? असे प्रश्न येथे उमटतही नाहीत. कुठल्याच पक्षाच्या जाहीरनाम्यात, प्रचारात अशा गोष्टींना स्थान नसतं... त्यांचे प्रचाराचे मुद्दे वेगळेच असतात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com