दिवाळीनिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने जादा विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे - दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने जादा विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे स्थानकातून हजरत निजामुद्दीन, जयपूरसह लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी, नागपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, शालिमार या मार्गांवर सुपरफास्ट विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. 

दिवाळीच्या सणासाठी महाराष्ट्रातून उत्तर भारतासह अन्य राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे सुपरफास्ट विशेष रेल्वे २२ ऑक्‍टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पुणे स्थानकातून दर मंगळवारी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोचणार आहे. तर २३ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान ही गाडी हजरत निजामुद्दीन येथून दर बुधवारी पहाटे चार वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून २५ मिनिटांनी पुणे स्थानकात पोचेल. लोणावळा, कल्याण, सुरत, बडोदा, कोटा, मथुरा जंक्‍शन आदी स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. 

पुणे-जयपूर सुपरफास्ट विशेष रेल्वे पुणे स्थानकातून २२ आणि २९ ऑक्‍टोबर, तसेच ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी जयपूर येथे पोचेल. तर परतीसाठी २३ आणि ३० ऑक्‍टोबर तसेच ६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी जयपूर स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी पुणे स्थानकात दाखल होणार आहे. या विशेष गाड्या लोणावळा, कल्याण, सुरत, अजमेर, फुलेरा जंक्‍शन आदी स्थानकांवर थांबणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special trains for Diwali