व्हॉटसअप बनत आहे लग्न जुळवण्याचे नवे माध्यम!

योगेश फरपट
रविवार, 14 मे 2017

सुनिल जवंजाळ पाटील यांनी सोशल मिडियाचा वापर करून मोबाईलमधील ओळखीचे नंबर मराठा समाजातील व्यक्तींना 'महाराष्ट्र मराठा सोयरीक' या ग्रुपवर जोडले. या ग्रुपला मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रुपच्या माध्यमातून विवाह जुळविण्याची कल्पना अनेकांना आवडली. आतापर्यंत गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर अशा प्रकारचे विवाह जुळवणारे 376 पेक्षा अधिक ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत 1700 पेक्षा अधिक विवाह जुळून आले आहेत.

अकोला - 'लग्नगाठी या भूतलावर नव्हे तर स्वर्गातच जुळून येतात', असे म्हटले जाते. मात्र इथे तर प्रत्यक्षात लग्नगाठी बांधण्यासाठी व्हॉट्‌सअपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून मराठा समाजातील सातशेपेक्षा जास्त विवाहाच्या रेशीमगाठी बांधण्यात "महाराष्ट्र मराठा सोयरीक' ग्रुपला यश आले आहे.

कमी होत चाललेले लिंगगुणोत्तर प्रमाण, मुला-मुलींच्या अपेक्षा, जीवनानाचा उंचावलेला स्तर या सर्व कारणांमुळे अलिकडेच्या काळात विवाहासाठी योग्य जोडीदार शोधणे आव्हानात्मक काम बनले आहे. "घर पहावे बांधून आणि लग्न करावे बघून' अशा म्हणीची प्रचिती आज बहुतेक विवाहेच्छुकांच्या कुटुंबात बघायला मिळते. काळाच्या ओघात विवाह जुळविण्याच्या पद्धतीत होणारे बदल व वाढती महागाई यामुळे समाजातील सर्वच घटकांना मुला-मुलींची लग्नं म्हणजे एक मोठी समस्या वाटत चालली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व पालकांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने व्यवसायाने शेतकरी असलेले सुनिल जवंजाळ पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. 29 जानेवारी 2016 रोजी त्यांना सहज कल्पना सुचली; अन त्यांनी सोशल मिडियाचा वापर करून मोबाईलमधील ओळखीचे नंबर मराठा समाजातील व्यक्तींना "महाराष्ट्र मराठा सोयरीक' या ग्रुपवर जोडले. त्यावर मुलामुलींचे बायोडाटा पोस्ट केले. या ग्रुपला मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रुपच्या माध्यमातून विवाह जुळविण्याची कल्पना अनेकांना आवडली. आतापर्यंत गाव, तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर अशा प्रकारचे विवाह जुळवणारे 376 पेक्षा अधिक ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत 1700 पेक्षा अधिक विवाह जुळून आले आहेत.

अनेक ग्रुपच्या ऍडमीनची जबाबदारी तालुक्‍यातील उत्साही कार्यकर्त्याकडे सोपविण्यात आली आहे. मराठा समाजातील लग्नासाठी इच्छुक युवक-युवतींचे परिचय पत्र ग्रुपवर टाकले जात आहेत. आपल्या आवडीनुसार थेट संबधीत उपवर-वधू पित्याला संपर्क करून सोयरीक जुळविली जात आहे.

सर्वात मोठे सामाजिक नेटवर्क
या ग्रुपचा फायदा असा झाला की सोशल मिडियावर मराठा समाजाचे राज्यातील सर्वात मोठे सामाजिक नेटवर्क तयार झाले. समाजाला विनामुल्य सेवा देत आतापर्यंत पुणे, औरंगाबाद व अहमदनगर येथे महामेळावे घेण्यात आले आहेत. त्यातून अनेक युवक-युवती विवाहबद्ध झालेत.

समाजाच्या नाकर्तेपणामुळे आज व्यावसायिक विवाहसंस्था पालकांची लूट करीत आहेत. पालकांनी याला बळी पडू नये. समाजातील प्रत्येकाने जिव्हाळा बाळगून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे.
- सुनील जवंजाळ पाटील, बुलडाणा

माझा मुलाची औरंगाबाद व महाराष्ट्र सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून नुकतीच सोयरीक झाली. 16 मे रोजी विवाह सोहळा पार पडत आहे. मी ग्रुपच्या नियमानुसार कोणताही हुंडा घेतला नाही.
- रंगनाथ भानुसे, सेवानिवृत्त पोलिस निरिक्षक, औरंगाबाद

Web Title: special Whats App group for arranging marriage