Breaking : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर!
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. यापूर्वी जाहीर केलेले संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकाबाबत संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून लेखी सूचना मागविल्या होत्या. मंडळाकडे आलेल्या सूचनांची नोंद घेत संभाव्य वेळापत्रकच राज्य मंडळाने अंतिम केले आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी उपलब्ध आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.
त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री विद्यार्थ्यांनी करून घ्यावी, तसेच त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, तसेच व्हॉट्सअॅप किंवा अन्य माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.