कॉपी करणाऱ्यांची खैर नाही...दहावी बारावी विद्यार्थ्यांबाबात बोर्डाचा मोठा निर्णय: SSC HSC Exam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSC HSC Exam

SSC HSC Exam : कॉपी करणाऱ्यांची खैर नाही...दहावी बारावी विद्यार्थ्यांबाबात बोर्डाचा मोठा निर्णय

राज्य मंडळाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी राज्य मंडळाकडून घेतली जात आहे. (SSC HSC Exam copy free campaign xerox shops center )

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान मोबाईलद्वारे किंवा अन्य माध्यमातून पेपरफुटी रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्स दुकाने बंद राहणार आहेत.

कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षेच्या आधी परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर कोण कोणती कार्यवाही करावी या संदर्भात राज्यमंडळाने नुकतेच परिपत्रक जारी केले. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक भरारी पथक असणार आहे. तालुक्यांमध्ये केंद्राची संख्या जास्त असल्यास एक पेक्षा अधिक भरारी पथक दहावी-बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर जातील.

परीक्षा काळात झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांचा घोळका असतो. झेरॉक्स सेंटर्समधून मिनी कॉपी पुरवल्या जातात. असे कॉपीचे प्रकार रोखण्याकरता परीक्षा केंद्रातील 100 मीटरपर्यंतच्या परीसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, परिणामी 144 कलम सुद्धा लागू करण्याची शक्यता आहे.

बोर्डाकडून विशेष काळजी

  • वेळेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार नाही.

  • प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाटल्यानंतर परीक्षा केंद्रावर कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रवेश नसेल.

  • बोर्ड परीक्षा केंद्रावरील शंभर मीटर अंतरावर झेरॉक्स सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील.

  • प्रत्येक तालुक्यात भरारी पथक ही परीक्षा केंद्रावर जाऊन वेळोवेळी तपासणी करेल.

  • परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असेल. परिणामी 144 कलम सुद्धा लागू केला जाऊ शकतो.

  • परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध (Rusticate) करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.