फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्य शासनामार्फत दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तत्काळ घेण्यात येते. मात्र, या फेरपरीक्षेचा निकाल 15 ऑगस्टनंतर लागत असल्याने फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला असून, आता त्यांना 31 ऑगस्टपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे.

आज पत्रकार परिषदेत तावडे यांनी सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या निर्णयाबाबतची माहिती दिली. तावडे या वेळी म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 15 ऑगस्टपूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया संपविणे आवश्‍यक आहे. मात्र, यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळे राज्य शासनामार्फत याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका सादर करण्यात आली होती. या याचिकेमध्ये फेरपरीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 31 ऑगस्ट अशी मुदत मिळावी, अशी विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची ही विनंती मान्य केली आहे.

Web Title: SSC & HSC reexam Vinod Tawde