दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 23.66 टक्के 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे - राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलैत घेतलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल 23.66 टक्के लागला आहे. या परीक्षेला एक लाख 21 हजार 59 विद्यार्थी बसले होते. त्यातील 28 हजार 645 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर एटीकेटीद्वारे अकरावीतील प्रवेशासाठी 60 हजार 544 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. 

पुणे - राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलैत घेतलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल 23.66 टक्के लागला आहे. या परीक्षेला एक लाख 21 हजार 59 विद्यार्थी बसले होते. त्यातील 28 हजार 645 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर एटीकेटीद्वारे अकरावीतील प्रवेशासाठी 60 हजार 544 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. 

फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अन्य तांत्रिक अभ्यासक्रमाकडे जाता येईल, अशा विद्यार्थ्यांची संख्या 29 हजार 926 आहे. या परीक्षेतील निकालाबाबत आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करता येणार आहे. त्यासाठी 30 ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या काळात अर्ज करता येईल. तसेच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती हवी असल्यास 30ऑगस्टपासून 18 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. 

दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊण टक्‍क्‍यांनी घसरला आहे. निकालात पुणे विभाग सहाव्या क्रमांकावर असून, विभागाचा निकाल 23.73 टक्के आहे. फेरपरीक्षेचा निकाल सर्वाधिक या वर्षी औरंगाबाद विभागाचा (32.83 टक्के) आहे, दुसऱ्या क्रमांकावर अमरावती (31.77), तिसऱ्या क्रमांकावर नाशिक (29.35), चौथ्या क्रमांकावर लातूर (28.50) पाचव्या क्रमांकावर नागपूर (27.14) आहे. सर्वांत कमी निकाल कोल्हापूर विभागाचा 14.21 टक्के आहे. 

अकरावीचे वेळापत्रक 2 सप्टेंबरला 
फेरपरीक्षेत एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 60 हजार 554 आहे. या विद्यार्थ्यांनाही एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. याबाबत सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ""अकरावी प्रवेशाची सध्या "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावरील प्रवेशाची फेरी सुरू आहे. ती संपल्यानंतर फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरी होईल. त्याचे वेळापत्रक आणि प्रक्रियेची कार्यपद्धती दोन सप्टेंबर रोजी जाहीर केली जाईल.'' 

Web Title: SSC re-exam results 23.66 percent