'लालपरी'ला वर्षाला पाचशे कोटींचा खड्डा

तात्या लांडगे
गुरुवार, 19 जुलै 2018

उत्पन्न 7200 कोटी अन्‌ खर्च 7720 कोटींचा

उत्पन्न 7200 कोटी अन्‌ खर्च 7720 कोटींचा
सोलापूर - जोरदार पाऊस असो की उन्हाचा कडाका अथवा कडाक्‍याची थंडी असो...अशा विविध संकटांच्या खड्ड्यातून मार्ग काढत प्रवाशांना अहोरात्र सेवा देणारी लालपरी मागील पाच-सहा वर्षांपासून खडतर मार्गावरून प्रवास करत आहे. वार्षिक उत्पन्न सात हजार 200 कोटींचे आणि खर्च मात्र सात हजार 720 कोटी रुपयांचा होत असल्याने दर वर्षी पाचशे कोटी रुपयांचा खड्डा सहन करावा लागत असल्याची माहिती राज्य परिवहन विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

मागील कित्येक वर्षांपासून खेड्यापाड्यांना शहरांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलेल्या राज्य परिवहनची आर्थिक स्थिती सध्या बिघडली आहे. राज्यातील 90 टक्‍के गावांमध्ये एसटीची सेवा पोहोचली आहे. परंतु, खासगी वाहनांची संख्या वाढल्याने कित्येक लांब पल्ल्याच्या बस प्रवाशांविना अथवा कमी प्रवाशांवरच वाहतात. खासगी वाहतुकीचे प्रमाण राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढले असून, अवैध वाहतूक बोकाळली आहे. तसेच डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने तोट्यात आणखी वाढ झाल्याचे राज्य परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

शासकीय योजनांद्वारे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या माध्यमातून राज्य सरकारकडून दर वर्षी मिळणाऱ्या बाराशे कोटी रुपयांमधून कर्मचाऱ्यांचे वेतन भागविले जाते. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तोट्यांमुळे नव्या बसची गरज असूनही जुन्या बस दुरुस्त करून वाहतूक सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

अशी आहे स्थिती...
18,010 एकूण एसटी बस
7,200 कोटी वार्षिक उत्पन्न
1,05016 एकूण कर्मचारी
3,150 कोटी वेतनावरील खर्च
2,900 कोटी डिझेलवरील खर्च
1,670 कोटी अन्य देखभाल-दुरुस्ती खर्च
520 कोटी एकूण तूट

Web Title: ST Bus 500 Crore loss in year