esakal | एसटीच्या उत्पन्नात 643 कोटींची घट
sakal

बोलून बातमी शोधा

St-bus

खेड्यापाड्यांपासून शहरांपर्यंत रात्रंदिवस प्रवाशांची सेवा करणाऱ्या "लालपरी'च्या उत्पन्नात घट होत आहे. मागील काही वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ खड्ड्यातच जात असल्याचे चित्र आहे.

एसटीच्या उत्पन्नात 643 कोटींची घट

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर - खेड्यापाड्यांपासून शहरांपर्यंत रात्रंदिवस प्रवाशांची सेवा करणाऱ्या "लालपरी'च्या उत्पन्नात घट होत आहे. मागील काही वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ खड्ड्यातच जात असल्याचे चित्र आहे. यंदा एसटी परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात सुमारे 643 कोटींची घट झाली असतानाच त्यात वाढ व्हावी म्हणून महामंडळाने तीन वर्षांत कोणतीच मोहीम राबविलेली नाही, तरीही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांकडे बोट केले आहे. 

हात दाखवा अन्‌ बस थांबवा, हे ब्रीदवाक्‍य घेऊन प्रवाशांची सेवा करणारी लालपरी आता हात दाखवूनही थांबतच नसल्याचा अनुभव अनेक प्रवाशांना येऊ लागला आहे. बसमध्ये मोजकेच प्रवासी अथवा वाहक व चालकांशिवाय कोणीच नसतानाही लालपरीचा वेग कमी झालेला दिसत नाही. विभाग नियंत्रकांनी कारवाईचा इशारा देऊनही परिस्थिती सुधारत नसल्याची चर्चा आहे. अनेक बसगाड्यांमध्ये अस्वच्छता पाहायला मिळते, तर काही गाड्यांच्या काचा व आसने तुटलेली आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांनी खासगी वाहनांमधून प्रवास करणेच पसंत केले आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची वेतनवाढीसाठी झालेली आंदोलने, इंधन दरवाढीचाही फटका महामंडळाला बसल्याचे सूत्रांनी सांगितले. एक लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा संसार महामंडळाच्या माध्यमातून सुखाचा सुरू आहे, मात्र दिवसेंदिवस या लालपरीची अवस्था बिकट होत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्‍त केली आहे. 

राज्याची स्थिती 
एकूण बस  - 18,500 
कर्मचाऱ्यांची संख्या  - 1,07,000 
शासनाकडून मिळणारी वार्षिक रक्‍कम  - 14,00 कोटी 
उत्पन्नात घट  - 643 कोटी 

राज्य परिवहन महामंडळाच्या बस राज्यभर प्रवाशांची सेवा करत असतानाही दरवर्षी उत्पन्नात घटच होत आहे. उत्पन्न वाढावे यादृष्टीने कर्मचाऱ्यांनी स्वत:हून प्रयत्न करण्याची गरज आहे. उत्पन्न वाढविण्याची प्रमुख जबाबदारी कर्मचाऱ्यांचीच आहे. 
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री 

loading image
go to top