थकलेल्या लालपरीकडून प्रवाशांची सेवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

तीन वर्षांत बस खरेदीच नाही; नऊ हजार गाड्यांची दुरुस्ती

तीन वर्षांत बस खरेदीच नाही; नऊ हजार गाड्यांची दुरुस्ती
सोलापूर - उन्हाळा, हिवाळा असो की पावसाळा, खड्डा असो की चढ-उतार, तरीही प्रवाशांना रात्रंदिवस सेवा देणाऱ्या लालपरीचे आयुष्य संपले, तरीही पुन्हा तिला दुरुस्त करून रस्त्यावर धावण्यासाठी तयार केले जात आहे. मागील तीन वर्षांत राज्य परिवहन विभागाने एकही नवी बस खरेदी केली नाही. दुसरीकडे मात्र सुमारे 30 कोटी रुपये खर्चून नऊ हजार बस दुरुस्त केल्या असून, त्याद्वारे प्रवाशांची सेवा करून घेतली जात आहे.

राज्य परिवहनच्या ताफ्यातील बस दर सात वर्षांनी मुदतबाह्य होतात. या बस दुरुस्त करून पुन्हा वापरण्याला उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून 2016 मध्ये मंजुरी मिळाली. त्या पार्श्‍वभूमीवर तीन वर्षांत नऊ हजार 130 बस दुरुस्त करून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्याचेही सांगण्यात आले. दापोडी, औरंगाबाद आणि नागपूर येथील राज्य परिवहनच्या कार्यशाळांमध्ये त्या बस दुरुस्त करण्यात येतात. तरीही दररोज सुमारे 70 ते 80 बस विविध मार्गांवर बंद पडत असल्याचे चित्र दिसून येते.

एसटीची व्यवस्था
19,020 - ताफ्यातील बस
3,000 - दर वर्षी होणाऱ्या मुदतबाह्य बस
9,130 - फेरवापरातील तीन वर्षांतील बस
10,500 कोटी रु. दुरुस्तीसाठी दर वर्षीचा खर्च

दर वर्षी तीन हजार बस मोडीत व मुदतबाह्य होतात. त्या पार्श्‍वभूमीवर नव्याने बस खरेदी झाल्या नसल्याने त्या बसचा सांगाडा, इंजिन दुरुस्ती अथवा बदलण्यात येते. राज्यभरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रमाणात बसची संख्या कमी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुदतबाह्य व मोडीत काढलेल्या बसची दुरुस्ती केली जाते.
- अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी), राज्य परिवहन

Web Title: ST Bus Passenger Service