एसटीचा संप मागे; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत तोडगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक वेतनवाढ जाहीर केली आहे; पण या वाढीसंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज होता. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ नेमकी किती झाली, हे आधी समजून घेणे गरजेचे आहे.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री.

मुंबई : एसटी कामगारांचा अघोषित संप शनिवारी रात्री अखेर मागे घेण्यात आला. एसटी महामंडळाचे अध्यक्ष, परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि कर्मचारी संघटनांमध्ये "सह्याद्री' अतिथीगृह येथे झालेल्या दीर्घ चर्चेत तोडगा निघाल्याने संघटनांनी हा निर्णय घेतला.

एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक संप सुरू केला होता. त्यामुळे सेवा ठप्प झाली होती. या संपावर तोडगा काढण्यासाठी रावते यांनी कामगार संघटनांबरोबर बैठक घेतली. या वेळी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, असे आवाहन त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केले. रावतेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत संप मागे घेत असल्याची घोषणा मान्यताप्राप्त संघटनेसह इतर विविध संघटनांनी केली.

बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्यासह मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राईब संघटनेचे निरभवणे, इंटकचे श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.

महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक वेतनवाढ जाहीर केली आहे; पण या वाढीसंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज होता. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ नेमकी किती झाली, हे आधी समजून घेणे गरजेचे आहे.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री.

Web Title: ST employee strike ends in Maharashtra