लालपरीला सोसवेना प्रवाशांचा भार

तात्या लांडगे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

राज्य परिवहन महामंडळाच्या 18 हजार 10 बस सध्या विविध मार्गांवर धावतात. त्या माध्यमातून राज्यात दररोज सुमारे 68-70 लाख प्रवासी ये-जा करतात. वास्तविक पाहता एक हजार लोकसंख्येमागे सहा बसची गरज आहे. परंतु, सद्यःस्थितीत राज्य परिवहनच्या ताफ्यात "शिवशाही'सह केवळ 19 हजार बस आहेत.

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या 18 हजार 10 बस सध्या विविध मार्गांवर धावतात. त्या माध्यमातून राज्यात दररोज सुमारे 68-70 लाख प्रवासी ये-जा करतात. वास्तविक पाहता एक हजार लोकसंख्येमागे सहा बसची गरज आहे. परंतु, सद्यःस्थितीत राज्य परिवहनच्या ताफ्यात "शिवशाही'सह केवळ 19 हजार बस आहेत.

या बसवर दरवर्षी तब्बल एक हजार 700 कोटी रुपये देखभाल-दुरुस्तीवरच खर्च होत आहेत. त्यातच इंधन दरवाढीमुळे 60 कोटी रुपयांचा अतिरिक्‍त भारदेखील महामंडळाला सहन करावा लागत आहे. राज्यात सार्वजनिक बसगाड्यांची उपलब्धता एक दशांशपेक्षाही कमी आहे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी सद्यःस्थितीत 75 हजार बसची गरज आहे. परंतु, त्याचे प्रमाण फक्‍त 19 हजार इतकेच असल्याचे दिसून येते. चीनमध्ये दर हजार लोकसंख्येमागे सहा बस रस्त्यावर धावतात. भारतात मात्र 10 हजार लोकसंख्येमागे अवघ्या चार बस असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यावर उपाय म्हणून केंद्रीय स्तरावरून ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या धर्तीवर बसगाड्या बनविणे व चालविण्यासाठी खासगी व्यक्‍ती अथवा कंपनीचा शोध सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

दिवसेंदिवस इंधन दरवाढ होतेय. पेट्रोलमुळे महागाई वाढत नाही तर ती डिझेलमुळे वाढते. उत्पन्नाच्या तुलनेत वर्षाला 500 कोटी रुपयांचा भुर्दंड सोसणाऱ्या राज्य परिवहनला इंधन दरवाढीचाही फटका बसतोय. परंतु, भाडेवाढीचा विचार सध्यातरी नाही. नव्या बससाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पैसे देणार असल्याचे सांगितले, परंतु, त्याचे पुढे काय झाले माहिती नाही. - दिवाकर रावते, परिवहनमंत्री 

राज्य परिवहन मंडळाची स्थिती 
एकूण लालपरी - 18,026 
शिवशाही - 974 
दरवर्षीचा दुरुस्ती खर्च - 1,672 कोटी 
दररोजच्या प्रवाशांची संख्या - 68-70 लाख 
प्रस्तावित बस - 700


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Facing problems regularly