Maratha Kranti Morcha होय, मी लालपरी जळतीये!

ST-Fire
ST-Fire

आलात का माझ्या रक्षा विसर्जनाला! या, या, पण आता मी तुम्हाला तुमच्या इच्छितस्थळी पोहचवू शकत नाही. जळून राख झालेल्या, तुकड्या तुकड्यात विखुरलेल्या माझ्या शरीरासह माझा आत्मा देखील आगीच्या धुरासोबत अनंतात विलिन झालाय. छोट्या गावांपासून मोठमोठ्या शहरांना जोडणारी जीवनवाहिनी बनून तुमच्या अविरत सेवेत रात्रंदिवस न थकता, न थांबता भिरभिरणारी मी लालपरी रस्त्यावर राख होऊन पडली आहे.

आंदोलनातील जाळपोळीच्या भीषण ज्वाळात माझं सुंदर परिपण भस्मसात झालयं. विविध मागण्यांसाठी केला जाणारा बंद, मोर्चा, आरक्षणाची लढाई किंवा दंगली होतच राहणार. अशा वेळी नाकरर्त्या सरकारवरील रोष निघतो तो माझ्यावरच. प्रत्येकी वेळी आंदोलनाच्या अग्निकुंडात आहुती दिली जाते ती माझीच. सरकारी मालमत्ता म्हणून माझ्यावर हल्लाबोल, दगडफेक केली जाते. पण असे करताना तुम्ही तुमच्याच सार्वजनिक संपत्तीचं अतोनात नुकसान करताय, हे कुणाच्याच का लक्षात येत नाही. नुकत्याच झालेल्या आंदोलनात कोट्यवधींचे नुकसान झालं म्हणे. हे नुकसान सरकार तुमच्याच खिशातून जास्तीत जास्त कर आकारून वसूल करतं. खरे तर आंदोलकांना आत्महत्या तसेच टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडणाऱ्या निर्ढावलेल्या सरकारमधील आमदार-खासदारांच्या भत्त्यातून माझे झालेले नुकसान वसुल करायला हवे. पण यासाठी प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिवाकराची नितांत गरज आहे.

टिचभर पोटासाठी घरातून बाहेर पडणारी चाकर माणसं, भारताचं उज्ज्वल भविष्य हाती असणारे शाळा-कॉलेजातील विद्यार्थी, महिला, वृद्ध, आजारी माणसं माझी सेवा बंद पडल्याने जागच्या जागी अडकून पडतात. जणू त्यांचा श्‍वासच थांबतो. कुणाची माय लेकराच्या वाटेकडे डोळे लावून असते. तर कुणाला पोटापाण्यासाठी वेळेत पोहोचायच असतं. शाळा-कॉलेज, कारखाने विनाकारण बंद ठेवावे लागतात. तर लाखो प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

शहरात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा आंदोलन काळात न मिळाल्याने त्यांची उपासमार होते ती वेगळीच.

आंदोलकांच्या हाती चक्का जाम, धरणे, घेराव, मूक मोर्चा असे अनेक पर्याय असताना मलाच पेटवण्याला प्राधान्य का बरं देता. या भडकलेल्या ज्वाळांची झळ तर सर्वांनाच बसते.

माझ्या इतर भगिनीं आंदोलनाच्या धगीने भाजून, पोळून निघतात. या दरम्यान काही खासगी वाहतूकदारांना अडकून पडलेल्या प्रवाशांची आयती आर्थिक शिकार मिळते. स्वस्तातली एसटी सेवा कोलमडल्याने त्यांच्या मनमानी कारभाराला बळी पडणाऱ्यांचे हाल पाहून माझे हळवे मन करपून जाते, असंख्य विषारी नागांनी दंश केल्याची तीव्र वेदना घायाळ करते.

शिवनेरी, शिवशाही, यशवंती, अश्‍वमेघ अशा अनेक रूपांचा माझा मुक्‍त विहार महाराष्ट्रासह इतर राज्यातही दिमाखदार असतो. राज्याचे उत्पन्न वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलणारी केवळ मीच आहे. तुमच्या सुख दुःखांची साक्ष देणाऱ्या माझ्यासारख्या लाखो पऱ्या राज्याच्या काणाकोपऱ्यातील रस्त्यांवरून अविरत धावत आहेत. आंदोलनात त्यांची चाके आगीच्या भस्मस्थानी देऊ नका... आमच्या मरणाचे सरण तुम्ही रचू नका... अन्‌ तुमच्याच हक्काच्या सुरक्षित प्रवासावर कुऱ्हाड चालवू नका... कृपया निष्पाप प्रवाशांच्या खोळंब्याला कारणीभूत ठरू नका...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com