एसटी कामगार संघटनेला वेतन करार अमान्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ही वेतनवाढ नाकारली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी 32 ते 48 टक्‍क्‍यांची वाढ दाखवली असली तरी, प्रत्यक्षात 17 ते 20 टक्‍क्‍यांची वाढ असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला. 

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने ही वेतनवाढ नाकारली आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी 32 ते 48 टक्‍क्‍यांची वाढ दाखवली असली तरी, प्रत्यक्षात 17 ते 20 टक्‍क्‍यांची वाढ असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला. 

कामगारांना भरघोस वाढ दिली आहे. ज्यांना हा करार मान्य नसेल त्यांनी राजीनामे देऊन कंत्राटी पद्धतीने काम स्वीकारावे, असा इशाराच परिवहनमंत्री रावते यांनी दिला आहे. त्याबाबत रविवारी एसटीच्या मान्यताप्राप्त संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. परिवहनमंत्र्यांनी जाहीर केलेला 4,849 कोटींच्या वेतनवाढीचा आकडा फुगवून दाखवला आहे, असा आरोप या बैठकीत करण्यात आला. संघटनेला विश्‍वासात न घेता ही वाढ करण्यात आली असून, त्याचा आराखडा अद्याप संघटनेला मिळालेला नाही. राजीनामा देण्याच्या दबावाला कामगार घाबरणार नाहीत, असा इशाराही शिंदे यांनी दिला. वेतनवाढीचा आराखडा सोमवारपर्यंत कामगार संघटनेला मिळेल. त्यानंतर प्रत्यक्षात किती वेतनवाढ झाली, याचा अंदाज येईल; मात्र रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ फसवी आहे, अशी टीकाही बैठकीत करण्यात आली. कामगारांनी ही वेतनवाढ नाकारत असल्याचा अर्ज भरून विरोध करावा, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. 

Web Title: ST labor unions pay invalid salary