एसटीचे लाइव्ह लोकेशन आता घरबसल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

व्हीटीएस प्रणालीची सुरवात व्हॉल्व्होतून
एसटी प्रशासनाने महामंडळाच्या ‘व्हॉल्व्हो’ या बसमध्ये नुकतीच ‘व्हीटीएस’ बसविली आहे. त्यामुळे या गाड्यांची सर्व माहिती या प्रणालीच्या आधारे बस स्थानकातील एलईडी स्क्रीनवर प्रवाशांना पाहता येत आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसबाबत संपूर्ण माहिती प्रवाशांना आता घरबसल्या मिळणार आहे. महामंडळाने प्रवाशांना गाड्यांची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे. ज्याद्वारे बस गाड्यांचे लाइव्ह लोकेशन, चालक व वाहकांची नावे, आदी माहिती समजणार आहे. सध्या शहरातील तीन स्थानकांसह राज्यातील १३ स्थानकांवर ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ (व्हीटीएस) प्रणाली प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. याचीच पुढची पायरी म्हणजे या ॲपची निर्मिती असणार आहे.

राज्यभरातील एसटीच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या हेतूने एसटी प्रशासनाने ‘व्हीटीएस’ प्रणाली सुरू केली आहे. सध्या या प्रणालीअंतर्गत पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन बस स्थानकासह राज्यातील १३ बस स्थानकांवर ‘एलईडी स्क्रीन’ बसविण्यात आल्या आहेत. या स्क्रीनद्वारे स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. तसेच पुढील दोन महिन्यांमध्ये एसटी प्रशासन ही माहिती देणारे मोबाईल ॲप सुरू करणार आहे. सुरवातीला ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील १६ स्थानकांवर राबविली जाणार आहे. त्यानंतर ती सेवा टप्प्याटप्प्याने राज्यभर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. ॲपमध्ये गाडीचा क्रमांक टाकून प्रवाशास संबंधित गाडीचे लाइव्ह लोकेशन पाहता येणार आहे. गाडीचा चालक व वाहक यांचीही माहिती त्यामध्ये उपलब्ध करण्यात येणार असून, एखाद्या मार्गावर किती बस, कोठे आहेत आणि स्थानकावर पोचण्यास किती वेळ लागू शकतो, आदी माहितीही प्रवाशांना या ॲपमध्ये पाहता येणार आहे.

प्रवाशांना गाड्यांची सर्व माहिती मोबाईलद्वारे कळावी, यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील काही स्थानकांवर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून ही सेवा सुरू केली असून, त्याचे ॲप लवकरच येणार आहे.
- यामिनी जोशी, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Live Location Mobile App VTS System