एसटीचे 11 कोटी प्रवासी घटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नव्या वर्षात "प्रवासी वाढवा' अभियान; लाखोंची बक्षिसे
मुंबई - दोन वर्षांत एसटीच्या प्रवाशांचा आकडा 11 कोटींनी कमी झाला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या महसुलावर परिणाम झाला आहे. प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी एसटी महामंडळ नव्या वर्षात "प्रवासी वाढवा' अभियान सुरू करणार आहे. सरासरी पाच टक्‍क्‍यांनी प्रवासी वाढवणाऱ्या आगाराला एक लाखाचे बक्षीस परिवहन विभागाने जाहीर केले आहे. राज्यभरातील 250 आगारांत हे अभियान राबवले जाणार आहे.

वडाप आणि बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे एसटीचे प्रवासी दोन वर्षांपासून सातत्याने कमी होत आहेत. सुमारे 18 हजार बस राज्याच्या कानाकोपऱ्यांत फिरत असल्या, तरी त्या तोटा सहन करून चालवल्या जात आहेत. तोटा कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना महामंडळ राबवत असले, तरी त्या अपुऱ्या ठरत आहेत. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी 1 जानेवारीपासून तीन महिन्यांकरिता महामंडळाने "प्रवासी वाढवा' अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटीच्या प्रवाशांची संख्या दिवसाला 64 लाख सात हजार आहे. अभियानामुळे त्यात पाच टक्‍क्‍यांनी वाढ होईल, अशी अपेक्षा महामंडळाला आहे.

1 जानेवारी ते 31 मार्च 2017 पर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून पहिला क्रमांक पटकावणाऱ्या आगाराला एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या आगाराला 75 हजार, तिसऱ्या क्रमांकाला 50 हजारांचे बक्षीस दिले जाईल. अभियानात उत्तम सांघिक कामगिरी करणाऱ्या विभागाला 50 हजार, तर प्रत्येक आगार पातळीवर सर्वोत्कृष्ट वाहकाला पाच हजार आणि चालकाला तीन हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. यापूर्वी 2008-09 मध्ये अशीच योजना महामंडळाने जाहीर केली होती; मात्र त्या वेळी त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

प्रवास एसटीचा...
वर्ष कमी झालेले प्रवासी

2011-12 260 कोटी 4 हजार
2012-13 261 कोटी 37 हजार
2013-14 256 कोटी 30 हजार
2014-15 245 कोटी 57 हजार
2015-16 245 कोटी 60 हजार

Web Title: ST reduced 11 million passengers