एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीची आस 

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीची आस 

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट आणि थकीत महागाई भत्ता देण्याची मागणी एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस यांनी केली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासन निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. 

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्याची परंपरा 13 वर्षांपूर्वी बंद झाली होती. परंतु, तीन वर्षांपासून कामगारांना दिवाळी भेट दिली जात आहे; त्यामुळे यावर्षीही दिवाळीपूर्वी हातात पैसे येतील, अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना आहे. दिवाळी भेट म्हणून कर्मचाऱ्यांना 2500 रुपये आणि अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये दिले जातात. यावर्षी दिवाळी भेटीसंदर्भातील निर्णय अद्याप झालेला नाही.

या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसने दिवाळी भेटीची रक्कम वाढवण्याची आणि थकीत महागाई भत्ता फरकासहित देण्याची मागणी केली आहे. दिवाळी भेट, महागाई भत्ता, दिवाळीपूर्वी ऑक्‍टोबरचा पगार याबाबत अद्याप निर्णय न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, यासंदर्भात सध्या निश्‍चित काहीही सांगता येणार नाही, असे एसटी महामंडळाचे माहिती व जनसंपर्क अधिकारी विष्णू काकडे म्हणाले. 

आचारसंहितेचे कारण 

एसटी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात देण्यात येणाऱ्या लाभाचा संबंध महामंडळाने विधानसभा निवडणूक आचारसंहितेशी जोडला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर चार दिवसांनी दिवाळी आहे. परंतु, एसटी प्रशासन कामगारांना दिवाळी भेट देण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. 


दिवाळी भेट हा एसटी कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. तीन वर्षांपासून हा लाभ दिला जातो. त्यामुळे या वर्षी निवडणूक आचारसंहितेचे कारण देता येणार नाही. एसटी प्रशासनाने हा निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. 
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com