पालखी महामार्गासाठी  काटेवाडीत मोजणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

बारामती - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी बारामती व इंदापूर तालुक्‍यातून ११६७ हरकती आल्या असून, सोमवारच्या विरोधानंतर आज (ता. ८) पासून काटेवाडी (ता. बारामती) येथे अधिकृत मोजणीस सुरवात झाली. 

बारामती - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी बारामती व इंदापूर तालुक्‍यातून ११६७ हरकती आल्या असून, सोमवारच्या विरोधानंतर आज (ता. ८) पासून काटेवाडी (ता. बारामती) येथे अधिकृत मोजणीस सुरवात झाली. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी इंदापूर व बारामती तालुक्‍यांत मिळून १८ लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीचे संपादन होणार आहे. त्यासाठी गावोगावच्या मोजण्या करावयाच्या आहेत. त्यानुसार इंदापूर तालुक्‍यातील तीन गावांच्या मोजण्या झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. मात्र सोमवारी (ता. ७) काटेवाडी येथे होणारी नियोजित मोजणी ग्रामस्थांच्या विरोधानंतर थांबवली. काटेवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांची यासंदर्भात बैठक झाली. यामध्ये रस्त्यासंदर्भात काही आक्षेप ग्रामस्थांनी नोंदविले. त्याचे शंकानिरसन झाल्याशिवाय मोजणी होऊ देणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संध्याकाळीही निकम यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांचा विरोध मावळल्यानंतर आज (ता. ८) सकाळी भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष मोजणीस सुरवात केली. 

दरम्यान, या मार्गाच्या भूसंपादनाविरोधात हरकतींचे प्रस्ताव दिलेले आहेत. त्यावर सुनावणी न होता थेट मोजणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नक्की नुकसान भरपाई किती मिळणार, याविषयी संभ्रम आहे.

Web Title: Start counting in Katewadi for Palkhi Highway