राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव भरतीची पुन्हा प्रक्रिया

राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव भरतीची पुन्हा प्रक्रिया

मुंबई - आदर्श प्रकरणातील फाइल मंत्रालयातून गहाळ झाल्याचे प्रकरण गाजलेले असताना, आता कृषी विद्यापीठांच्या कुलसचिव भरतीची फाइल मुख्यमंत्री कार्यालयातून हरवली आहे. संपूर्ण निवडप्रक्रिया पूर्ण झालेली ही फाइल होती. सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना कुलसचिव पदावर नेमण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावासह ही फाइल असल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. मात्र, यामुळे कोणत्याही संबंधितावर कारवाई करण्यात आलेली नसून, नव्याने पुन्हा भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चार वर्षांपासून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) या तीन विद्यापीठांवर पूर्णवेळ कुलसचिवाचे पद भरण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणींचा सामना विद्यापीठांना करावा लागत आहे. यासाठी २०१६ मध्ये कुलसचिव पदावर सरकारी सेवेतील अधिकारी प्रतिनियुक्‍तीने पाठवण्याबाबत निर्णय झाला. त्यानंतर या विद्यापीठात कुलसचिव भरतीची प्रक्रिया सुरू झाली. सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, वित्त विभागासह मुख्यमंत्री कार्यालयाने प्रक्रिया पूर्ण केली होती. 

सप्टेंबर २०१७ मध्ये अर्ज मागवण्यात आले. या अर्जावर कृषिमंत्री यांनी निर्णय घेऊन फाईल फेब्रुवारी २०१८ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. यावर मुख्यमंत्र्यांचा अंतिम निर्णयाचा शेरा देखील झाला. संकीर्ण १५१७ प्रक्र ३७२ भाग २/६A Agricultur dept  अशी ही फाईल होती.  मात्र, त्यानंतर ऑर्डर काढण्याचेच काम राहिले. पण, त्यानंतर ही फाइलच सापडत नसल्याने अधिकारी हवालदिल झाले. अखेरची नोंद मुख्यमंत्री कार्यालयातच असल्याने ही फाइल गहाळ झाल्याचे अधिकाऱ्यांच्या  लक्षात आले.

भरतीसाठी पुन्हा अर्ज मागवले
आता १५ जानेवारीला परिपत्रक काढून कुलसचिवपदाच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामुळे, अंतिम निर्णय झालेली फाईल हरवल्याने पुन्हा सरकारला द्रविडी प्राणायाम करावा लागणार आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कानावर हात ठेवणेच पसंत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com