राज्य बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांचा राजीनामा 

विजय गायकवाड
गुरुवार, 10 मे 2018

राज्यबॅंकेला लाभलेले दिग्गज सहकारमहर्षींचे मार्गदर्शन : चढ- उतार
राज्य सहकारी बँकेस विविध क्षेत्रातील प्रसिध्द व मान्यवर व्यक्तीचे मार्गदर्शन लाभले. त्यापैकी यशस्वी उद्योजक दिवंगत श्री.लल्लुभाई सामळदास, श्री.वैकुंठभाई मेहता, श्री.व्ही.डी.ठाकरसी आणि प्रतिभावंत प्रोफेसर श्री.डी.जी.कर्वे, डॉ. श्री.धनंजयराव गाडगीळ व श्री.आर.जी.सरैया यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख व नावलौकिक वेगळयाच उंचीवर पोहोचविला होता. आघाडीच्या काळात डबघाईला आलेल्या बॅंकेला प्रशासक मंडळाने तारले. परंतू पुन्हा राजकीय हस्तक्षेप सुरु झालेल्या राज्य बॅंक पुन्हा अडचणीत आली आहे.

मुंबई : अडचणीतील राज्य सहकारी शिखर बॅंकेचा कारभार रुळावर आल्यानंतर राज्य सरकारने नियुक्‍त केलेल्या अतिरिक्‍त प्रशासकीय संचालक मंडळाची अनागोंदी आणि राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून राज्य बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांचा अखेर राजीनामा दिला आहे. 

आघाडी सरकारच्या काळात डबघाईस आलेल्या या बॅंकेला १४ हजार कोटींच्या ठेवी आणि २०० कोटींचा आर्थिक नफा मिळवून देण्यात यशस्वी झालेले अर्थतज्ज्ञ आणि विद्यमान प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी १७ एप्रिलला राजीनामा दिला आहे. चार एप्रिल 2015 पासून डॉ. सुखदेवे हे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून सहकारातील शिखर संस्था असलेल्या या बॅंकेचा कारभार पाहत होते. त्यांच्यासोबत बॅंकिंग क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ अशोक मगदूम व के. एल. तांबे यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट 2017 मध्ये राज्य सरकारने बॅंकेच्या प्रशासकमंडळाच्या सदस्यपदी विद्याधर अनासकर (पुणे) आणि अविनाश महागावकर (सोलापूर) आणि संजय भेंडे (नागपूर) यांची नियुक्ती केली होती.

अविनाश महागावकर हे सोलापूरच्या लोकमंगल मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे संचालक असून लोकमंगल फाऊंडेशनचे ते संचालक असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत. तर संजय भेंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. भेंडे, महागावकर आणि अनास्कर यांनी ३१ मार्च २०१८ रोजी निवृत्त झालेले सरव्यवस्थापक आणि प्रभारी व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्या मुदतवाढीसाठी नियमबाह्य आग्रह धरल्याने प्रशासक मंडळता मतभेद निर्माण झाले होते. नवीन तीन सदस्य थेट सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने मूळ प्रशासकीय मंडळाच्या सोबत त्यांचे मतभेद सुरू झाले होते. राजकीय नेमणूक झाल्यानंतर बॅंकेच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप वाढून धोरणात्मक निर्णयात डॉ. सुखदेवे यांच्या प्रशासकीय मंडळावर दबाव येत असल्याची चर्चा सुरू होती. गतवर्षी याच जाचाला कंटाळून डिसेंबर 2017 ला अशोक मगदूम व तांबे या प्रशासकीय मंडळातील दोन सदस्यांनी राजीनामे दिले होते.  याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील आणि डॉ. सुखदेवे यांची संयुक्त बैठकही पार पडली. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार डॉ. सुखदेवेंचा निवृत्त झालेले सरव्यवस्थापक आणि प्रभारी व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुखांच्या मुदतवाढीला विरोध होता. व्यवस्थापकीय संचालक हा बॅंकेचा कार्यकारी प्रमुख असून  निवृत्त व्यक्तीकडे आर्थिक निर्णयांचे अधिकार देऊन उत्तरदायित्व कसे निश्चित करणार हा प्रमुख मुद्दा होता.  निवृत्त कर्मचाऱ्यांना मुदतवाढीचा नाबार्डचा आदेश जिल्हा बॅंकाना लागू असून राज्य बॅंकेला राज्य सरकारचे नियम लागू आहे. परंतू सुखदेवे वगळता इतर प्रशासक मंडळ मागील दाखले देत देशमुख यांच्या नियुक्तीसाठी हट्टाला पेटले होते. याबाबत प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुखदेवे  यांनी एप्रिलच्या पहील्या आठवड्यात राजीनाम्याचे अस्र उगारल्यानंतर सरकार दरबारी हालचाल होऊन, सहकार सचिव संधु यांच्या हस्तक्षेपाने वाद तुर्तास निवळला होता. परंतू बॅंकेच्या कामातील वाढता राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून कंटाळून राज्य बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांचा अखेर राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक दृष्टीक्षेपात :
- बॅकेंची स्थापन - १९११
- ३१ जिल्हा बॅंका आणि २१००० प्राथमिक सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था
- मार्च १९९६ रिजर्व बॅंकेकडून राज्यबॅंकेला  ११ मार्गदर्शक सूचना
- मार्च २०१० - राज्य बॅंक आर्थिक अडचणीत १४४ कोटींचा उणे नक्तमुल्य
- २०११ - राज्य बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक मंडळाची नेमणुक
- २०१५ -प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. एम.एल सुखदेवे 
- २०१६ -  राज्य बॅंकेला २४३ कोटींचा नफा : १० टक्के लाभांश वाटप
- २०१६- रिजर्व बॅंकेडून राज्य बॅंकेवर लादलेले निर्बंध उठले 
- २०१७ -बॅंकेच्या प्रशासकमंडळाच्या सदस्यपदी विद्याधर अनासकर (पुणे) आणि अविनाश महागावकर (सोलापूर) आणि  संजय भेंडे यांची  नियुक्ती
- एप्रिल २०१८ -  निवृत्त सरव्यवस्थापक आणि प्रभारी व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुखांच्या मुदतवाढीवरुन संचालक मंडळात मतभेद 
- मे -२०१७-  राज्य बॅंक प्रशासक  मंडळाचे अध्यक्षपदी डॉ. एम.एल सुखदेवे यांच्या राजीनाम्याची घोषणा 

राज्यबॅंकेला लाभलेले दिग्गज सहकारमहर्षींचे मार्गदर्शन : चढ- उतार
राज्य सहकारी बँकेस विविध क्षेत्रातील प्रसिध्द व मान्यवर व्यक्तीचे मार्गदर्शन लाभले. त्यापैकी यशस्वी उद्योजक दिवंगत श्री.लल्लुभाई सामळदास, श्री.वैकुंठभाई मेहता, श्री.व्ही.डी.ठाकरसी आणि प्रतिभावंत प्रोफेसर श्री.डी.जी.कर्वे, डॉ. श्री.धनंजयराव गाडगीळ व श्री.आर.जी.सरैया यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख व नावलौकिक वेगळयाच उंचीवर पोहोचविला होता. आघाडीच्या काळात डबघाईला आलेल्या बॅंकेला प्रशासक मंडळाने तारले. परंतू पुन्हा राजकीय हस्तक्षेप सुरु झालेल्या राज्य बॅंक पुन्हा अडचणीत आली आहे.

Web Title: state bank administrative body president ML Sukhdeve resigns