नगर परिषदांत आता एक वॉर्ड एक सदस्य

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 जानेवारी 2020

देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेत असताना नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब केला होता. या निर्णयात बदल करून पुन्हा ‘एक वॉर्ड एक सदस्य’ हे धोरण स्वीकारण्यात आले आहे. याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळ निर्णय
मुंबई - नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी आता एक वॉर्ड एक सदस्य पद्धतीचा अवलंब केला जाणार असून, त्यासाठी अधिनियमांमध्ये सुधारणा केली जाणार आहे; तसा अध्यादेश काढण्यास आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेत असताना नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब केला होता. या निर्णयात बदल करून पुन्हा ‘एक वॉर्ड एक सदस्य’ हे धोरण स्वीकारण्यात आले आहे. याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १०(२)मध्ये नगर परिषद निवडणुकांकरिता प्रभाग पद्धती व सदस्यसंख्या, याबाबतच्या स्पष्ट तरतुदी आहेत. याआधी २०१७ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार सद्यःस्थितीत नगर परिषद क्षेत्रात बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यात येतो.

या तरतुदीनुसार एका प्रभागात किमान दोन आणि कमाल तीन सदस्य परिषदेवर निवडून येतात. नगरपरिषद क्षेत्रांचा अधिक वेगाने विकास घडवून आणण्यासाठी एकसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची केलेली तरतूद ही प्रस्तावित महाराष्ट्र नगरपरिषद (सुधारणा) अधिनियम २०१९ च्या सुरुवातीच्या निवडणुकांपुरतीच लागू असणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार आवश्‍यक सुधारणांसह अध्यादेश मसुदा निश्‍चित करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Cabinet decision one ward one member