रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाकडे निधीच नाही

मिलिंद संगई
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने हे रस्ते तातडीने दुरुस्त व्हावे आहे राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. मात्र राज्य शासनाकडे यासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे आता पुढे आल्यामुळे हा विषय आता आणखी गंभीर होणार आहे.

बारामती शहर : राज्य सरकारकडे असलेल्या निधीचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जी कामे नव्याने हाती घेतलेली नाहीत, त्या कामाचे कार्यारंभ आदेश देऊ नयेत, येत्या 31 मार्च पर्यंत अशा सर्व कामांचे कार्यारंभ आदेश संस्थगित करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी दिली आहे .

यासंदर्भात गुरूवारी काढलेल्या एका पत्रकात ही सूचना करण्यात आलेली आहे. आशियाई बँक सहायीत व हायब्रीड एनुइटी योजनेअंतर्गत कामांना मात्र हा निकष लागू होणार नाही. सन 2019- 20 मधील उपलब्ध निधीवर असलेला ताण कमी व्हावा , तसेच सुरू असलेल्या काही कामांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास उपलब्ध झालेला निधी व भविष्यात उपलब्ध होणारा निधी यांचा विचार करून हा आदेश देण्यात आलेला आहे.

या आदेशामुळे ज्या कामांसाठी निधी उपलब्ध नाही अशी कामे आता 31 मार्चपर्यंत सुरू होणार नाहीत हे सिद्ध झाले आहे. एकीकडे राज्य खड्ड्यात गेले असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या विविध भागातून व्यक्त होत असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काल हा आदेश पारित करण्यात आल्यानंतर आता राज्यातील जनतेला आणखी काही महिने रस्त्यांवरील खड्ड्यातूनच मार्गक्रमणा करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे .

या विभागांतर्गत येणारे रस्ते व पूल विकास कार्यक्रमासंबंधी वस्तुस्थिती विचारात घेतल्यास हाती घेण्यात आलेल्या कामांची संख्या व उपलब्ध निधी यांच्यात प्रचंड विषमता असल्याचे दिसून येत असल्याचे या देशातच मान्य करण्यात आलेले आहे.

रस्ते विभागाचे सचिव चंद्रशेखर जोशी यांनी हा आदेश पारित केला आहे. या मुळे राज्य शासनाच्या आर्थिक परिस्थितीबाबत देखील साशंकता व्यक्त केली जात आहे. यंदा पावसाने अधिक हजेरी लावल्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने हे रस्ते तातडीने दुरुस्त व्हावे आहे राज्यातील जनतेची अपेक्षा आहे. मात्र राज्य शासनाकडे यासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे आता पुढे आल्यामुळे हा विषय आता आणखी गंभीर होणार आहे. येणाऱ्या नवीन सरकारपुढे देखील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी अतिरिक्त निधीची उपलब्धता करून देण्याचे आव्हान समोर असेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state government has no funds for the road work