MPSC च्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 March 2020

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने मोटर वाहन निरीक्षक या पदाची पूर्वपरीक्षा रविवारी घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध केंद्रांवर आयोजित परीक्षेत उमेदवारांनी मास्क घालून परीक्षा दिली.

मुंबई : संसर्गजन्य रोग कोरोनाने सध्या राज्यात थैमान घातले आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक कडक पावले उचलली आहेत. शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्यानंतर आता एमपीएससीच्या परीक्षांबाबतही राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयास भेट दिली. आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत, असे सांगितले. 

- Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; आता...

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या खंड २,३ आणि ४ मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याचे एक पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले असल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 

Image may contain: text

- रोनाल्डोची दर्यादिली; कोरोनाग्रस्तांसाठी हॉटेलमध्ये उभारलं हॉस्पिटल!

या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ३१ मार्च २०२० पर्यंत राज्य पातळीवरील घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशा सूचना संबंधितांच्या मान्यतेने देण्यात आली असून याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे म्हटले आहे. या वृत्ताला दुजोरा देणारे ट्विट राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. 

- Coronavirus : सुटलो बाबा एकदाचे; कोरोनाग्रस्त इराणमधील भारतीय मायदेशी परतले!​

मास्क घालून एमपीएससीची परीक्षा 

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने मोटर वाहन निरीक्षक या पदाची पूर्वपरीक्षा रविवारी घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध केंद्रांवर आयोजित परीक्षेत उमेदवारांनी मास्क घालून परीक्षा दिली. राज्याच्या विविध भागांतून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी पुण्यात आले होते. मात्र, परीक्षा केंद्रावर कोरोनासंदर्भात कोणतीही अतिरिक्त सुविधा पुरविण्यात आली नव्हती. काही विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या सॅनिटायझरचा वापर परीक्षेच्या कालावधीत केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Government takes big decision about MPSC exams