वसंतराव नाईक यांचे महत्त्व कमी करायचे आहे? 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 मे 2017

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा जयंती दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जात असताना, त्याच दिवशी मतदार दिन साजरा करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाचे तीव्र पडसाद विधान परिषदेत आज उमटले. सरकारला वसंतराव नाईक यांचे महत्त्व कमी करायचे आहे का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. 

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा जयंती दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जात असताना, त्याच दिवशी मतदार दिन साजरा करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाचे तीव्र पडसाद विधान परिषदेत आज उमटले. सरकारला वसंतराव नाईक यांचे महत्त्व कमी करायचे आहे का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. 

जीएसटीसाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. या वेळी विरोधी पक्षातल्या सदस्यांनी यावर आक्षेप घेत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. दरम्यान, वसंतराव नाईक यांच्या पावलावर पाउल ठेवूनच सरकार वाटचाल करत आहे, त्यांच्या कृषीविषयक कार्याबद्दल आदरच आहे, असे सांगत गेल्या दोन वर्षांत सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना केल्याचे सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने हा दिवस निश्‍चित केला आहे, निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असल्यामुळे सरकार आयोगाला सूचना करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. वसंतराव नाईक यांची जयंती असलेला 1 जुलै हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा न करता सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवसाच्या दिवशीच साजरा करण्यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारला दिले. तसेच वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी विधानभवनातल्या त्यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी विधान परिषदेतला एकही आमदार कधीच उपस्थित नसतो, असे सांगत सभापतींनी या वेळी नाराजी व्यक्त केली. 

कॉंग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी कल्याणजवळील सापड गावात नथुराम गोडसे यांचे स्मारक उभे केले जात असल्यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. हिंदू महासभेने त्यासाठी येथे जमीनही विकत घेतली आहे. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणारी असल्याचे ते म्हणाले. यावर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अशी परवानगी देणे शक्‍य नाही. याबाबतची माहिती घेऊन चौकशी करू, असे सभागृहाला सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे हेमंत टकले म्हणाले, एकीकडे पानसरे, दाभोलकर यांच्या हत्येचा तपास लागत नसताना दुसरीकडे शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करणे, खासगी जागेत नथुराम गोडसेचा पुतळा उभा करणे चिंताजनक आहे. परवानगी दिली नसेल तर हे थांबवणे राज्य सरकारचे काम असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: The state government's circular of the circular has emerged today in the Legislative Council