राज्यात 2060 हवामान केंद्र कार्यान्वित

Mahavedh-System
Mahavedh-System

मुंबई - लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकऱ्यांना साध्य होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी २०६० स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केली असून, त्याद्वारे गावस्तरापर्यंतच्या शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे.

हवामानाशी संबंधित सूचना आणि अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी असा उदेश आहे. गेल्या काही वर्षांतील हवामानातील वाढत्या बदलामुळे अवेळी पाऊस, गारपीट, वादळ, यांचा तडाखा पिकांना बसून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनादेखील बसला आहे. ही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्त्वावर बसविण्यात आली आहे. 

या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे वाऱ्याची नेमकी गती किती आहे आणि ते कोणत्या दिशेने वाहत आहेत ते कळेल, तसेच हवेतील तापमान, सापेक्ष आर्द्रता पावसाचे प्रमाण, याविषयीची माहिती शेतकऱ्यांनादेखील गावनिहाय कळेल. 

ज्या ठिकाणी अशी यंत्रणा कार्यरत झाली आहे तेथे हवामानाची अचूक माहिती प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने एकत्रित करण्याची व्यवस्था पुणे येथील कृषी महाविद्यालयात करण्यात आली आहे. ही माहिती लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य ती पावले आम्ही उचलणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एलईडी स्क्रीनद्वारे माहिती
सरकारने यापूर्वीच ‘एम-किसान’ सल्लागार यंत्रणा अमलात आणली असून, त्याद्वारे ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून हवामानासंबंधी सामान्य माहिती पोहोचविली जात आहे; परंतु राज्यात १.३७ कोटी शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ ५० लाख शेतकरीच या व्यवस्थेवर नोंदले गेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना ही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एलईडी स्क्रीन उभारून त्याद्वारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे, असे राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com