राज्यात काही दिवसांत पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

मुंबई - काही दिवसांपासून राज्यभरातील कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. या आठवड्यात गडगडाटासह पावसाची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यापासून दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्‍यता आहे. 

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुरताच पारा खाली उतरेल. मंगळवारपासून दक्षिण-मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. बुधवारपासून विदर्भातही गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पंधरवड्यापासूनच उकाडा सुरू झाला. राज्यातील बहुतांश भागांतील कमाल तापमानात सरासरीहून चार ते पाच अंश सेल्सिअसने तापमानात वाढ दिसून आली. त्यानंतर गेल्या आठवड्याच्या शेवटी तापमान तीन अंशांनी खाली सरकले. किनारपट्टीच्या भागांतही तापमान खाली घसरल्याने गारवा जाणवला. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत कमाल तापमान 30 अंशांखाली आल्याने उकाडा कमी झाला. कोकण आणि विदर्भातही तापमानात किंचित घट झाल्याची नोंद झाली; मात्र दोन-तीन दिवसांत राज्यातील कमाल व किमान तापमानात वाढ होईल, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने म्हटले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातही दोन ते तीन अंशांनी वाढ होईल. 

वारे ईशान्येकडून वाहत असल्याने सध्या उष्णता कमी आहे. काही दिवसांत पुन्हा तापमानात वाढ होईल. विदर्भात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 
- के. एस. होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान खाते 

Web Title: State of the possibility of rain in a few days