
Radhakrishna Vikhe: 'अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा'
राहाता: राज्यात जनतेच्या मनातील सरकार काम करते आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
आज त्यांनी वाकडी परिसरातील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन आपल्या दारी या उपक्रमाचा आढावा घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारी योजनांची अंमलबजावणी व वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. (State Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil informed compensation crop damage due heavy rain will be deposited farmers bank accounts in the coming weeks)
वीज वितरण कंपनीच्या बाबतीत भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना तातडीने जिल्हा विकास नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहारे, बापूसाहेब लहारे, विवीध विभागांचे अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, की तहसील कार्यालयातून आवश्यक असलेल्या दाखल्यांची समस्या दूर करण्यासाठी याच महिन्यात एका अर्जावर अनेक दाखले उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे.
जमिनींच्या मोजणीबाबतची बहुतांश प्रकरणे आता निकाली निघत आहेत. त्यासाठी रोवर तंत्रज्ञानाची मोठी मदत यासाठी झाली आहे. जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या शासनाच्या वाळूविक्री केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळतो. सहाशे रुपये प्रतिब्रास दराने वाळू उपलब्ध होते आहे. शेतकऱ्यांना आता एका रुपयात पीकविम्याचा लाभ दिला जाईल.