राज्यातील बोटींची माहिती ऍपवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील बोटी, जहाज, बंदरे यांच्यासह हवामान आदी महत्त्वाची माहिती नागरिकांना एका क्‍लिकवर मिळावी, यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) ऍप तयार केले आहे. बोटींबाबतच्या तक्रारीही या ऍपवरून करता येणार आहेत.

मुंबई - राज्यातील बोटी, जहाज, बंदरे यांच्यासह हवामान आदी महत्त्वाची माहिती नागरिकांना एका क्‍लिकवर मिळावी, यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) ऍप तयार केले आहे. बोटींबाबतच्या तक्रारीही या ऍपवरून करता येणार आहेत.

नियमाप्रमाणे बोटीवर मालकाचे नाव आणि मंडळाकडून दिले जाणारे प्रमाणपत्र लावणे बंधनकारक असते; मात्र कित्येक बोटमालक त्याकडे काणाडोळा करतात. सागरी मंडळाने तयार केलेल्या या ऍपवर राज्यातील बंदरे आणि जेट्टीची माहिती असेल. खास करून फेरीबोटीची माहिती ऍपवरून मिळेल. तसेच जहाजाचे नाव टाकल्यास ते कधी बांधले गेले होते, त्याचे मालक कोण आहेत, हे क्‍लिकवर शोधता येणार आहे. भरती ओहोटीच्या वेळा, सागरी किनारपट्टीवरील दीपस्तंभ त्याचबरोबर हवामानाची माहितीही मिळणार आहे.

चौतीस टक्के बोटी 37 वर्षे जुन्या
मंडळाच्या वतीने बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतील (भाऊचा धक्का ते मांडवा) प्रवासी बोटींचे सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या हद्दीत सुमारे 200 बोटी आहेत. त्यापैकी 35 टक्के बोटी या 37 वर्षे जुन्या आहेत; तर 15 टक्के बोटी या 18 ते 35 वर्षांतील आहेत. सर्व्हेक्षणादरम्यान काही बोटी या ब्रिटिशकालीन असल्याचे उघड झाले. हेरिटेज बोटीच्या नावाखाली या बोटी सध्या सुरू आहेत. बोटीकरिता नियमावली तयार झाल्यास जलप्रदूषण आणि प्रवासी वाहतुकीकरिता धोकादायक असलेल्या जुन्या बोटी भंगारात काढल्या जातील.

सागरी प्रकल्प राबवणार
महाराष्ट्र सागरी मंडळाचे राज्यात नेमके किती भूखंड आहेत, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. ही माहिती मिळाल्यास तेथील अतिक्रमणे हटवली जातील. त्या जागांवर मंडळाच्या वतीने सागरी पर्यटनाकरिता काही प्रकल्प राबवले जाणार आहेत.

Web Title: state ship information on app