म. गांधींविरोधातील वक्तव्य कंगनाला भोवणार; काँग्रेस कायदेशीर कारवाईच्या तयारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut
म. गांधींविरोधातील वक्तव्य कंगनाला भोवणार; काँग्रेस करणार तक्रार दाखल

म. गांधींविरोधातील वक्तव्य कंगनाला भोवणार; काँग्रेस करणार तक्रार दाखल

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : महात्मा गांधीजींबद्दल बेताल वक्तव्य आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हीला भोवणार आहे. कारण याबद्दल तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी काँग्रेसनं सुरु केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली.

पटोले म्हणाले, महात्मा गांधींबद्दल बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसकडून कंगना रणौतविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. काँग्रेस या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तिच्याविरोधात अधिकृत तक्रार नोंदवणार आहे.

काय म्हणाली होती कंगना?

महात्मा गांधींवर टीका करताना कंगनानं म्हटलंय की, "हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला शिकवलं की, एखाद्याने तुम्हाला थप्पड लगावली तर त्याच्यासमोर दुसरा गाल पुढे करा आणि या मार्गाने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. मात्र, या मार्गाने स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. तुमचे आदर्श विचारपूर्वक निवडा" कंगनाच्या या विधानावरच काँग्रेसने आक्षेप घेतला असून यातून गांधींजींची बदनामी करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा: कंगना रणौत म्हणाली, मी माझा 'पद्म श्री' पुरस्कार परत करेन पण....

दरम्यान, आठवड्याभरापूर्वीच कंगनानं एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना भारताला सन १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे सन २०१४ मध्ये मिळालं आहे, असं तिनं म्हटलं होतं. तिच्या या विधानानंतर तिला मोठ्या टीकेला सामोर जावं लागलं. यावेळी तिच्या या विधानाला मराठीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांनीही समर्थन दिलं होतं. यामुळे त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

loading image
go to top