Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप | Statewide indefinite strike from March 14 for old pension scheme | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Old Pension Scheme

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ मार्च पासून राज्यव्यापी बेमुदत संप

Old Pension Scheme News: जूनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणी करीता १४ मार्च पासून कर्मचारी महासंघाने राज्य व्यापी बेमुदत संप पुकारला आहे.

त्यामुळे राज्यभरातील शासकीय कार्यालयातील कारभार ठप्प होण्याची शक्यता आहे. या संपाला मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरीकाला सामाजिक, राजकिय व आर्थिक न्याय देण्याचे आश्वासित केलेले आहे. तसेच समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला सन्मानाने जगता यावे अशी परिस्थिती निर्माण करण्याचे नागरीकांना विविध तरतुदींद्वारे वचन दिलेले आहे.

कामगार जगतातील प्रत्येकाचा सेवानिवृत्ती नंतरच्या जगण्याचा हक्क या संविधानिक मूल्यांमध्ये सामावलेला आहे.

सर्वतोपरि असलेल्या संविधानिक मूल्यांना आणि समाजाप्रति असलेल्या संविधानिक आश्वासनांना बाजूला सारून तत्कालीन सरकारांनी असंविधानिक निर्णय घेऊन केंद्र व राज्यांतील कामगार, कर्मचाऱ्यांना मिळत असलेले सेवानिवृत्ती वेतन काढून घेऊन त्यांना सेवानिवृत्ती नंतरच्या जगण्याच्या हक्कांपासून वंचित केले आहे.

कामगार वर्गाची त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्याची जगण्याची सोय म्हणून सेवानिवृत्ती योजनेचा अविष्कार झाला, जे संविधानिक आश्वासन आहे. ज्यापासून शासन व सत्ता आता जबाबदारी झटकून पळ काढत आहेत.

राज्य सरकारी, महापालिका, नगरपालिका यातील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्याची सर्व संघटनांकडून मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकारने जूनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या संपाला संघटनांचा पाठिंबा असल्याचे शशांक राव यांनी सांगितले आहे.