esakal | आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

stays work on Aarey metro shed

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला.

आरे कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पदभार सांभाळताच येथील आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या जनक्षोभाची दखल घेत उद्धव यांनी आज कारशेडच्या कामालाच ब्रेक लावला. राज्याचे वैभव गमावून विकासकामे होणार नसल्याचा स्पष्ट इशाराच त्यांनी या वेळी दिला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

‘आरे’तील मेट्रो कारशेडच्या कामाचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मुंबईतील ‘मेट्रो’च्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र  पुढची दिशा ठरत नाहीत तोपर्यंत ‘आरे’तील झाडाचे एक पानही तोडले जाणार नाही, असे ठाकरेंनी स्पष्ट करत झाडांची कत्तल मला चालणार नाही, असा इशाराही प्रशासनाला दिला. 

उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या दिवशी सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीतही त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेचा, करदात्यांच्या पैशाचा विनियोग कसा झाला याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. करदाते आणि कष्टकऱ्यांच्या पैशाची उधळपट्‌टी मला चालणार नाही असे सूचित केले.

मेट्रो कारशेडला स्थगिती देणे हे दुर्दैवी आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांची हानी होणार आहे. अशा निर्णयांनी गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि प्रकल्प रखडतील.
- देवेंद्र फडणवीस, भाजप नेते