निवासी डॉक्टरची कहाणी; हॉस्पिटल, होस्टेल हेच विश्‍व! 

Doctor
Doctor

कोव्हिडची एवढी भिती जगावर आहे, पण त्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची काय स्थिती असेल… त्यांचा दिवस कसा असतो, ते कसे स्वत:ला सांभाळून दिवसभर काम करतात… मुंबईतील एका रूग्णालयातील निवासी डॉकटरची ही पीपीई किटमधील कहाणी.....

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन महिन्यांपासून घराच्यांना भेटू शकलो नाही. घरच्यांनाच काय, पण सोबतचे काही चारपाच डॉक्‍टर, नर्सेस सोडले, तर बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटला आहे. कोरोनाच्या भीतीने आई-वडिलांनाही दोन महिन्यांपासून भेटलेलो नाही. पर्सनल प्रोटेक्‍टिव्ह इक्विपमेंटमध्ये सतत सहा, आठ तास राहिल्यावर शारीरिक व्याधी तर आहे, पण मानसिक थकवा त्याहून प्रचंड येतो.

कोविडवर उपचार करणाऱ्या सर्वच डॉक्‍टर या परिस्थितीतही ठामपणे उभे आहेत. सतत आठ तास पीपीई किटमध्ये राहून सुरुवातील काही डॉक्‍टरांना चक्करही येत होती; तर काहींना पीपीई काढल्यानंतर काही जाणीवच होत नव्हती, पण आता हळूहळू सवय होतेय. अतिधोकादायक विभागात काम करत असल्याने ड्युटी संपल्यावरही कोणालाही भेटत नाही. बोलता येत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्टेलमध्येच स्वतःला क्वॉरंटाईन करावे लागते. मुंबई, ठाण्यात राहणारे डॉक्‍टरही गेल्या दोन महिन्यांपासून घरी जाण्याचे टाळत आहेत.

घरी पालकांना धोका निर्माण होऊ नये म्हणून... कोरोनाच्या उपचारात डॉक्‍टरावर फक्त शारीरिक परिणाम नव्हे, तर  मानसिक परिणामही मोठा होत असतो. एकदा वॉर्डमध्ये गेल्यावर क्षणभरही बाहेर येता येत नाही. फक्त कोरोनाचे रुग्ण डोळ्यासमोर असतात. हॉस्पिटलचा वॉर्ड आणि होस्टेलची रूम एवढंच जग झालं आहे. त्यापुढे आम्ही दोन महिन्यांत कुठे जाऊही शकलो नाही. मुळात धाडसच केलं नाही. सहकाऱ्यांसोबत वावरतानाही विचार करावा लागतो. कदाचित आपल्यामुळे दुसऱ्याला कोरोनाची बाधा होईल ही भीती मनात २४ तास असते. ही भीती घेऊनच दोन महिने जगलो आहोत.

पीपीई किटची जगभरात मर्यादा आहे. तसेच खर्चही जास्त आहे. त्यामुळे हे किट वाया जाऊ नये याची खबरदारीही घ्यावी लागते. त्यासाठीच एकदा किट घातले की मग सहा ते आठ तास ते उतरवता येत नाही. पर्सनल प्रोटेक्‍टिव्ह इक्विपमेंट डॉक्‍टरांसाठी वरदान आहे, पण आठ तास त्यामध्ये वावरणं म्हणजे मे महिन्याच्या दुपारी वाळवंटात उभं राहण्यासारखं आहे. आठ तास पाणीही पिता येत नाही. आणि स्वच्छतागृहातही जाता येत नाही. त्यामुळे ड्युटीवर जाण्यापूर्वीही जास्त पाणी पिता येत नाही. २०० मि.ली. पाणी आणि २०० मि.ली. ओआरएफ डॉक्‍टरांना प्यावे लागते. दुसऱ्या बाजूला शरीरातून घामाचे पाट वाहत असतात. त्याचा त्रास शरीराला होत असतो. आठ तासांची ड्युटी संपवल्यानंतर पाण्याचा पहिला घोटही पिणे अवघड झाले आहे. या सर्वांचा शारीरिक परिणाम तर नक्कीच होतो. चक्कर येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशा व्याधी आता नेहमीच्या झाल्या आहेत. पीपीई किट उतरवल्यानंतर काही तास जेवणाचीही इच्छा होत नाही. अंथरुणात पडल्यावर थकवा जाणवू लागतो. त्यानंतरचा संपूर्ण वेळ झोपण्यातच जातो.
(शब्दांकन - समीर सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com