कुत्र्यांचा चावा 3 कोटींचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

#StreetDogs
- भटक्या कुत्र्यांबाबत सूचना पाठवा.. फेसबुक आणि ट्विटरवर
- ई मेल करा webeditor@esakal.com वर

पुणे : राज्यातील एखाद्या "क' दर्जाच्या नगर परिषदेच्या अर्थसंकल्पाइतका खर्च पुणेकरांनी श्‍वानदंशाच्या उपचारांवर गेल्या चौदा वर्षांत केला आहे. या वर्षांमध्ये एक लाख 54 हजार 792 जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, त्यांच्या उपचारांचा खर्च सुमारे 46 कोटी रुपये होतो. 

शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत पुण्यातील रस्त्यांवर सगळीकडे ही कुत्री झुंडीने फिरत असतात. येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जातात. माणसावर हल्ला करून त्यांना चावण्याच्याही घटना वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. श्‍वानदंशानंतर सर्वाधिक धोका रेबिजचा असतो. त्यामुळे स्वतःवर उपचार करण्यासाठी हे रुग्ण अखेर खासगी रुग्णालयाची पायरी चढतात. या रुग्णालयांमध्ये किमान पाच ते सहा इंजेक्‍शनांचा किमान खर्च तीन हजार रुपयांच्या दरम्यान होतो. त्यातच श्‍वानदंश गंभीर असेल, चेहऱ्याच्या, डोक्‍याच्या जवळ असेल तर तो खर्च चाळीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्‍यता असते. 

निष्क्रीय सरकारी रुग्णालये 
सरकारी रुग्णालयांमधून श्‍वानदंशाचे इंजेक्‍शन मोफत दिले जाते. त्यामुळे रुग्ण तातडीने महापालिका किंवा ससूनसारख्या सरकारी रुग्णालयात जातो. पण, या दोन्ही ठिकाणी उपचारांसाठी गेलेल्या पुणेकरांचे अनुभव अत्यंत वाईट आहेत. त्यामुळे श्‍वानदंशावरील खर्च वाढला असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

असा झाला पुणेकरांचा खर्च 
- शहरातील खासगी रुग्णालयात श्‍वानंदशाच्या उपचारांचा किमान खर्च ः तीन हजार रुपये 
- गेल्या चौदा वर्षांत श्‍वानदंशाच्या घटना ः एक लाख 54 हजार 792 
- श्‍वानदंशाच्या उपचारांचा सुमारे खर्च ः 46 कोटी 43 लाख 76 हजार 

वर्ष ............. श्‍वानदंश झालेल्यांची संख्या 
2005 ....... 9145 
2006 .......4281 
2007 .......6560 
2008 .......9645 
2009 .......12539 
2010 .......11523 
2011 ....... 12840 
2012 ....... 12731 
2013 .......13668 
2014 ....... 12131 
2015 ....... 18567 
2016 ....... 17828 
2017 ....... 10340 
18 मे 2018 पर्यंत ....... 2994 

पुण्यात श्‍वानदंशाच्या प्रश्‍नाची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेने प्रथमच "रेस्क्‍यू टीम' तयार केली आहे. लवकरच हे पथक सक्रिय करण्यात येणार आहे. तसेच, शहरातील भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरणाच्या कामास मुदतवाढ देण्यात आली आहे. 
डॉ. अंजली साबणे 

शहरांमधील मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न ही डोकेदुखी झाली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीला मर्यादा घालण्यात आल्याने हा प्रश्‍न अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. त्याबाबत केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांच्याशी पत्रव्यवहार करून पुण्यात श्‍वानदंशाच्या प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. 
- मंजूषा नागपूर, नगरसेविका 

ससून रुग्णालयात व्यवस्थित माहिती तर मिळाली; पण या विभागातून त्या विभागात नुसत्या चकरा माराव्या लागल्या. पण, श्‍वानदंशाच्या इंजेक्‍शनापर्यंत काही केल्या पोचता आले नाही. अखेर, सरकारी रुग्णालयाचा नाद सोडला आणि खासगी रुग्णालयातून तीन हजार रुपये खर्च करून रेबिजची सहा इंजेक्‍शने घेतली. 
- अरविंद मुठे, नागरिक 

#StreetDogs
- भटक्या कुत्र्यांबाबत सूचना पाठवा.. फेसबुक आणि ट्विटरवर
- ई मेल करा webeditor@esakal.com वर

Web Title: Street Dogs Issue