उजनी परिसरातही पाण्यासाठी धडपड

उजनी परिसरातही पाण्यासाठी धडपड

कळस - उजनी धरणाच्या पाणलोटालगतच्या गावांनाही यंदा दुष्काळाच्या झळा सहन करण्याची वेळ आली आहे. उजनी धरण ११० टक्के भरूनही गतवर्षीच्या तुलनेत आज धरणाची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. धरणासाठी जमिनी दिलेल्यांनाच आता रात्रीचा दिवस करून पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.  

इंदापूर तालुक्‍यातील उजनी पाणलोट परिसर सध्या कोरडा पडल्याचे दिसते. उघड्या पडलेल्या जमिनीवर जनावरांसाठी चारा पिके अनेकांनी घेतली आहेत. परंतु, आता ही पिके जगविणेही अवघड झाले आहे. उजनीलगतच्या अनेक पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्यांनी स्वखर्चातून चारी खोदून पाणी विद्युतपंपापर्यंत आणण्याचे काम केले आहे. परंतु, तेवढे करूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे जास्तीचे पाइप टाकून व आगाऊ विद्युतपंप जोडून पाणी शेतीच्या बांधापर्यंत पोचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. 

इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव गावाजवळ एका चारीवर सुमारे दीडशेहून अधिक विद्युतपंप आहेत. पाइपलाइनच्या साह्याने शेतकऱ्यांनी शेतीपर्यंत पाणी पोचविले आहे. मात्र, या ठिकाणी निम्म्याहून अधिक पंप बंद अवस्थेत आढळले. या चारीतून येणाऱ्या पाण्याच्या झुळव्यावर ठरावीक पंप चालतात. यासाठी जास्तीचे पाइप टाकून एक जास्तीचा विद्युतपंप बसवून ते पाणी जलवाहिनीतून शेतीपर्यंत पोचविले जाते. 

पाणी येणाऱ्या दिशेने एकापुढे एक अशा चढाओढीने पाइप वाढविण्याची शर्यत लागली आहे. त्यासाठी दोन व्यक्ती लागतात. एकाने चारीत पाइपचे तोंड पकडून बसायचे व दुसऱ्याने पंप बंद- सुरू करण्यासाठी वरती थांबायचे. 

अनेकदा रात्रीच्या वेळीही वीज असेल तेव्हा अशीच कसरत करावी लागते. त्यातच आता वीज कपातीचा निर्णय घेतला आहे. तो शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना या उक्तीप्रमाणे ठरला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com