विद्यार्थ्यांचा निधी प्राध्यापकांच्या पगारावर खर्च 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

मुंबई विद्यापीठातील विधी शाखेतील विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी न्या. एम. सी. छागला ट्रस्टच्या वतीने 1 कोटींचा निधी विद्यापीठाला देण्यात आला; परंतु विद्यापीठाने हा निधी विद्यार्थ्यांऐवजी प्राध्यापकांवरच उधळल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठातील विधी शाखेतील विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी न्या. एम. सी. छागला ट्रस्टच्या वतीने 1 कोटींचा निधी विद्यापीठाला देण्यात आला; परंतु विद्यापीठाने हा निधी विद्यार्थ्यांऐवजी प्राध्यापकांवरच उधळल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्टुडंट लॉ काऊन्सिलचे अध्यक्ष ऍड. सचिन पवार यांनी केली आहे. 

विधी शाखेतील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी न्या. एम. सी. छागला ट्रस्टने मुंबई विद्यापीठाला 2009 मध्ये एक कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीचा वापर प्रशासनाने कोणत्या कारणांसाठी केला, याबाबतची माहिती पवार यांनी माहिती अधिकारातून मागविली होती. या निधीतून विधी विभागाने तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित होते; परंतु विभागाने दहा वर्षांत बोटावर मोजण्याइतकेच कार्यक्रम आयोजित केले. त्यासाठी एक लाख 49 हजार 255 रुपये खर्च झाले; मात्र विधी शाखेतील प्राध्यापकांच्या पगारावर आतापर्यंत तब्बल 12 लाख 53 हजार 718 रुपये खर्च केल्याची माहिती प्रशासनाने पवार यांना दिली आहे. 

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सामाजिक संस्था मदतीचा हात पुढे करते; मात्र विद्यापीठ प्रशासन या पैशाची उधळपट्टी अधिकाऱ्यांच्या पगारावर करत आहे. विद्यार्थ्यांचा पैसा ज्यांनी पगारावर खर्च केला, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पवार यांनी कुलगुरूंकडे केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student funds spent on the professors salary