कांदा अनुदानासाठी निकषांची चाळण 

कांदा अनुदानासाठी निकषांची चाळण 

सोलापूर : कांदा अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी लेखापरीक्षकांकडून करण्यात येत असून त्यानंतर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समितीद्वारेही तपासणी केली जात आहे. या निकषांच्या चाळणीत पावणेदोन लाख प्राप्त अर्जांपैकी 83 हजार शेतकरीच पात्र ठरल्याचे पणन विभागाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला. परंतु, त्याचा लेखी अध्यादेश अद्यापही निघाला नसल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीत हेलपाटे मारावे लागत आहेत. 

राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतमालांचे दरही अस्थिर आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल 200 रुपयांचे अनुदान देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी बाजार समितीची हिशोब पावती, सात-बारा उताऱ्यावर कांद्याची नोंद बंधनकारक आहे. लेखापरीक्षक, तालुका व जिल्हास्तरीय समितीच्या पडताळणीत सांगली, सातारा, जालना, लातूर, बीड या जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याचा अर्ज पात्र ठरला नाही. कांदा अनुदानासाठी 18 जिल्ह्यांतील 77 बाजार समित्यांमधील पाच लाख 70 हजार शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले. मात्र, त्यापैकी आतापर्यंत एक लाख 72 हजार शेतकऱ्यांनीच बाजार समित्यांकडे अर्ज केले असून उर्वरित शेतकरी निकषांच्या कात्रीत अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

परराज्यात कांदा विकलेले शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरणार आहेत. 15 डिसेंबरऐवजी 31 डिसेंबरपर्यंत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्याचा मंत्रिमंडळ निर्णय झाला. परंतु, त्याचा लेखी अध्यादेश प्राप्त झालेला नाही. अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंतच राहील. 
- नामदेव सूर्यवंशी, सहसंचालक, पणन 

कांदा अनुदानाची स्थिती 
अपेक्षित शेतकरी 
5,70,031 
प्राप्त अर्ज 
1,72,017 
पात्र अर्ज 
82,655 

कांदा अनुदानासाठी 31 डिसेंबरपर्यंतचे शेतकरी पात्र ठरतील, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. मात्र, त्याचा लेखी अध्यादेश न निघाल्याने मला परत जावे लागले. एक हजार 600 रुपयांसाठी माझे दिवसभराचे काम थांबवून 500 रुपये जाणे-येण्याच्या खर्ची गेले. 
- नागेश पोळ, शेतकरी, शेटफळ (ता. करमाळा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com