Solapur News: कांद्याला प्रतिक्विंटल अनुदान द्या! शेतकऱ्यांना विकावा लागतोय ३ अन्‌ ६ रुपये किलोने कांदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur News
कांद्याला प्रतिक्विंटल अनुदान द्या! शेतकऱ्यांना विकावा लागतोय ३ अन्‌ ६ रुपये किलोने कांदा

Solapur News: कांद्याला प्रतिक्विंटल अनुदान द्या! शेतकऱ्यांना विकावा लागतोय ३ अन्‌ ६ रुपये किलोने कांदा

Solapur News : अतिवृष्टीच्या संकटातून सावरताना शेतकऱ्यांना कांद्याचा आधार वाटत होता. पण, कांद्याचे सरासरी दर आता ६०० रुपयांपर्यंत खाली आले असून दर्जेदार कांद्याला प्रतिक्विंटल बाराशे रुपयांचाच भाव मिळत आहे. मशागत, बियाणे, लागवड, खत, काढणी, कापणी करून बाजार समितीत नेईपर्यंतचा खर्च देखील निघत नसल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत.

नाशिकनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याची मोठी बाजारपेठ मानली जाते. डिसेंबर-जानेवारीत कांद्याला सरासरी दोन हजारांवर दर मिळत होता.

दर्जेदार कांदा दोन महिन्यांपूर्वी अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मात्र, कांद्याचे दर वाढतील या आशेवरील शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली आहे. हजारो रुपयांचा खर्च करूनही मशागतीचा खर्च देखील निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

सोलापूर बाजार समितीत सोलापूरसह धाराशिव, बीड, पुणे (इंदापूर), कर्नाटक (विजयपूर, कलबुर्गी) येथून कांद्याची मोठी आवक आहे. मागील १५-२० दिवसांत सोलापूर बाजार समितीत दररोज सरासरी ४५० ट्रक कांदा विक्रीसाठी आणला जातोय.

पण, कांदा कितीही चांगला असला तरीदेखील सरासरी ८०० ते एक हजार रुपयांपर्यंतच दर मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा शेतातच कोळपून टाकला असून काहीजण दरवाढीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. मात्र, पररराज्यात मागणीच कमी झाल्याने दर वाढीची शक्यता धूसर मानली जात आहे.

शेतकऱ्यांची अनुदानाची मागणी

अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्यानंतरही शेतकरी त्यातून सावरले. कांदा निर्यातीस परवानगी मिळाल्यानंतर कांद्याचे दर वाढतील आणि चांगले उत्पन्न येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दोन महिन्यांपूर्वी असलेला दर सध्या खूपच घसरला आहे.

एका शेतकऱ्याला एक हजार किलो कांदा विकल्यावर दोन रुपये हाती पडले. तर एका शेतकऱ्याला साडेचारशे किलो कांदा विकल्यावर पदरमोड करून गावी जावे लागल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत.

मशागतीचा खर्च देखील निघत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल अनुदान मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बॅंकांचे कर्ज फेडायचे कसं?

कांदा लागवडीनंतर बहुतेक शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीककर्ज घेतले. कांद्याच्या मशागतीसाठी हेक्टरी ६५ हजार रुपयांचे पीककर्ज मिळते.

तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी आहे, पण आता कांद्याचे दर खूपच खाली आल्याने मुद्दल फेडायचे कसे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.