कारखान्यांना मिळणार "ऍडव्हान्स' गाळप परवाना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

आगामी हंगामाची संभाव्य स्थिती
उसाचे क्षेत्र 6.43 लाख हेक्‍टर
गाळप परवान्याला सुरवात 1 नोव्हेंबर
गाळप घेणारे कारखाने 110
अंदाजित साखर उत्पादन 720 लाख क्‍विंटल

पूर अन्‌ कमी पावसामुळे साखर उत्पन्नात घट : कारखानदारांची 27 ऑगस्टला बैठक
सोलापूर - राज्यातील दुष्काळ आणि उसाचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात पावसाची हुलकावणी या कारणांमुळे उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच लाख हेक्‍टरची घट झाल्याचा अंदाज आहे. त्यातच आता सांगली व कोल्हापुरातील पुरामुळेही उसाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी गाळप हंगामाच्या नियोजनाची तातडीची बैठक 27 ऑगस्टला बोलावण्यात आल्याची माहिती साखर आयुक्‍तालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान, एक सप्टेंबरपासून ऍडव्हान्स्‌ड ऑनलाइन गाळप परवाने देण्यास सुरवात होईल, असेही सांगण्यात आले.

गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उसाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला; तर यंदा सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी व बीड या उसाच्या पट्ट्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. सांगली, कोल्हापुरात उसाचे क्षेत्र अधिक आहे; परंतु सलग आठ-दहा दिवस पूरस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्याने त्यात उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हंगाम वेळेवर सुरू होईल, मात्र किती कारखाने चालतील अन्‌ किती दिवस चालतील, यावर अद्याप सांगणे अशक्‍य आहे. दरम्यान, मागच्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पन्नात तब्बल 350 लाख क्‍विंटलची घट होईल, असेही सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत मंत्री समितीच्या निर्णयानंतरच गाळप परवाने दिले जात होते; परंतु राज्यातील उसाची स्थिती पाहता ऍडव्हान्स्‌ गाळप परवाने दिले जाणार आहेत. मात्र, गाळप कधीपासून सुरू होणार, याचा निर्णय मंत्री समितीच्या निणर्यानंतरच ठरेल, असेही साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.

सांगली व कोल्हापुरातील पूर आणि उसाचे क्षेत्र अधिक असलेल्या जिल्ह्यांमधील कमी पाऊस, या पार्श्‍वभूमीवर साखर आयुक्‍तांनी कारखानदारांसमवेत 27 ऑगस्टला बैठक बोलावली आहे. दरम्यान, मंत्री समितीच्या निर्णयापूर्वी यंदा प्रथमच कारखान्यांना ऍडव्हान्स्‌ गाळप परवाने देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून गाळप परवाने दिले जातील.
- पांडुरंग गायकवाड, सहसंचालक, विकास, साखर आयुक्‍तालय, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar Factory Advance Galap Permission