अडचणी दूर केल्यास इथेनॉल उद्योगाला चालना

अनिल सावळे
शनिवार, 20 जुलै 2019

इथेनॉल उद्योगासमोरील अडचणी  
ऑईल डेपोकडे पुरेशी साठवणूक क्षमता नाही 
करारातील अटीनुसार २१ दिवसांत कारखान्यांना रक्‍कम मिळत नाही 
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून इथेनॉलवर निर्बंध 
पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगीला विलंब 

इथेनॉलचा प्रतिलिटर दर : ४३.४७ रुपये ते ५९.१९ रुपये

पुणे - राज्यातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे ७१ कोटी लिटर आहे. परंतु, कारखान्यांकडे क्षमता असूनही या वर्षी ऑईल कंपन्यांकडून ४२ कोटी लिटरची मागणी आहे. सध्या इथेनॉल मिश्रणाचे धोरण दहा टक्‍के असून, ते २० टक्‍क्‍यांपर्यंत न्यावे. तसेच, केंद्र सरकारने अडचणी दूर केल्यास इथेनॉल उद्योगाला चालना मिळेल, असा सूर साखर उद्योगाकडून व्यक्‍त होत आहे.

साखर उद्योगाने केवळ साखरेचे उत्पादन घेण्याऐवजी इथेनॉलकडे वळावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केले. या पार्श्‍वभूमीवर सद्यःस्थितीबाबत माहिती घेतली असता, राज्यात ५६ साखर कारखान्यांची इथेनॉल उत्पादन क्षमता ७१ कोटी लिटर असल्याची आकडेवारी हाती आली. त्यात सहकारी साखर कारखान्यांमधील ३१ इथेनॉल प्रकल्पांची क्षमता ३३ कोटी लिटर आहे. खासगी कारखान्यांमधील २३ इथेनॉल प्रकल्पांमध्ये ३६ कोटी लिटर असून, उर्वरित दोन स्वतंत्र प्रकल्पांमधील इथेनॉल उत्पादन क्षमता सव्वादोन कोटी लिटर आहे. यंदाच्या हंगामात थेट उसापासून इथेनॉलनिर्मिती करणारा ‘वारणा’ हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. ऑईल कंपन्यांनी २०१८-१९ या वर्षात ४२ कोटी लिटर इथेनॉलची मागणी केली होती. साखर कारखान्यांनी मार्चअखेर सुमारे १३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील म्हणाले, ‘‘ इथेनॉलचे उत्पादन वाढविल्यास शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्‍य होईल. केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्‍विंटल साडेतीन हजार रुपये हमीभाव द्यावा.’’

नॅचरल शुगर कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्‍हणाले की, इथेनॉलचे मिश्रण २० टक्‍क्‍यांपर्यंत २०२५ पर्यंत नेण्याचे सरकारचे धोरण आहे. अतिरिक्‍त साखरेच्या वापराबाबत जागरूकता झाल्यामुळे साखरेला पर्याय म्हणून इथेनॉलकडे वळावे लागेल.

सध्या कारखान्यांकडे अतिरिक्‍त साखर शिल्लक आहे. पुढील हंगामात उत्पादन वाढल्यास साखरेचे दर अडचणीत येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारखान्यांनी साखर उत्पादन कमी करून इथेनॉलनिर्मितीवर भर देण्याची गरज आहे. 
- डॉ. संजय भोसले, साखर सहसंचालक (उपपदार्थ विभाग)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar Factory Ethanol Business Sugar Business