ऊस नियंत्रण मंडळाची येत्या 25 रोजी बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

मुंबई - दर गळीत हंगामाच्या अगोदर नियमितपणे होणारी ऊस नियंत्रण मंडळाची बैठक येत्या 25 तारखेला होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार ते साखरनिर्मिती करणारे कारखाने यांच्या मागण्या आणि समस्या यावर चर्चा करण्यात येणार आहे. 

मुंबई - दर गळीत हंगामाच्या अगोदर नियमितपणे होणारी ऊस नियंत्रण मंडळाची बैठक येत्या 25 तारखेला होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत ऊसउत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार ते साखरनिर्मिती करणारे कारखाने यांच्या मागण्या आणि समस्या यावर चर्चा करण्यात येणार आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 3200 रुपये इतका "एफआरपी' देण्याची मागणी केली आहे. मात्र साखर कारखान्याच्या अडचणी लक्षात घेता उसाला शेट्टी यांच्या मागणीएवढा "एफआरपी' मिळणे अशक्‍य असल्याचे बोलले जाते. साधारण 2400 ते 2800 च्या आसपास एफआरपी मिळू शकतो. शेतकऱ्यांना "एफआरपी'नुसार ऊसदर देण्यासाठी गेल्या वर्षी सरकारला सुमारे एक हजार 850 कोटी रुपयांचे कर्ज सहकारी साखर कारखान्यांना देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्याचे व्याजही सरकार भरणार आहे. गेल्या वर्षी खुल्या बाजारातील साखरेचे दर कोसळल्याने साखर कारखाने अडचणीत आले होते. त्यामुळे सरकारने 870 कोटी रुपयांचा ऊसखरेदी कर माफ केला होता. त्याचबरोर राज्य सरकारने प्रतिटन अनुदान साखर कारखान्यांना दिले होते. याप्रमाणे यंदाही कारखाना प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, ऊसतोड कामगार प्रतिनिधी यांच्याकडून अशाच प्रकारे मदतीची अपेक्षा सरकारकडे या बैठकीत केली जाण्याची शक्‍यता आहे. 

मागील वर्षी ऊस गळीत हंगामापूर्वीची ही बैठक 9 सप्टेंबर 2015 रोजी झाली होती. यंदा गळीत हंगाम पुढे सरकल्याने ही बैठक ही लांबणीवर पडली आहे. या बैठकीला सहकार, वित्त सचिव, साखर आयुक्‍त, साखर कारखाना प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, खासगी साखर कारखाना प्रतिनिधी, कृषी संचालक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ऊसवाहतूक खर्च, वाहतूक अंतर टप्पे, ऊसतोडणी मजुरी, मजूर ने-आण खर्च, ट्रक, ट्रॅक्‍टर वाहन देखभाल दुरुस्ती खर्च याबाबतही चर्चा केली जाणार आहे.

Web Title: Sugarcane Control Board meeting on the coming 25